विमान प्रवासात १५ इंचाचे मॅकबुक प्रो लॅपटॉप सोबत बाळगू नका अशी विनंती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हवाई प्रवाशांना केली आहे. सुरक्षेला धोका असल्यामुळे अॅपलने हे लॅपटॉप परत मागवले आहेत. अॅपल ही मुळची अमेरिकन कंपनी आहे. अमेरिकेच्या एफएएने विमान प्रवासात १५ इंचाच्या मॅकबुक प्रो लॅपटॉपवर बंदी घातली आहे.

मॅकबुक प्रो ची जुनी मॉडेल्स विमान प्रवासात सोबत बाळगण्यावर अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. या लॅपटॉपची बॅटरी मोठया प्रमाणावर गरम होते. त्यामुळे आग लागण्याचा धोका आहे. त्यामुळे हँड बॅग किंवा अन्य सामानासोबत १५ इंचाचे मॅकबुक प्रो लॅपटॉप आणू नये अशी विनंती डीजीसीएने हवाई प्रवाशांना केली आहे.

जून महिन्यात अॅपलने बिघाड असलेले १५ इंचाचे मॅकबुक प्रो लॅपटॉप परत मागवले होते. लॅपटॉपची बॅटरी गरम होत असल्याच्या २६ तक्रारी मिळाल्याचे अॅपलकडून सांगण्यात आले. सप्टेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१७ मध्ये विक्री झालेल्या १५ इंचाच्या मॅकबुक प्रो लॅपटॉपमध्ये ही समस्या असण्याची शक्यता आहे.