स्पाइस जेट कंपनीच्या विमानाच्या बडतर्फ करण्यात आलेल्या वैमानिकाचा परवाना नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने निलंबित केला आहे. बँकॉक-कोलकाता उड्डाणादरम्यान हवाईसुंदरीला कॉकपिटमध्ये बसण्याची अनुमती दिल्याचा या वैमानिकावर आरोप आहे.
त्याचप्रमाणे बँकॉक-कोलकाता विमानाच्या मुख्य वैमानिकासमवेत कॉकपिटमध्ये अधिक वेळ काढल्याप्रकरणी त्या विमानातील एका कर्मचाऱ्यालाही निलंबित करण्यात आले आहे, असे महासंचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
स्पाइस जेट कंपनीने यापूर्वीच सदर वैमानिकाला सेवेतून बडतर्फ केले आहे. हवाईसुंदरीसह कॉकपिटमध्ये स्वत:ला कोंडून घेतल्याने सहवैमानिकाला बँकॉक ते कोलकाता आणि परतीच्या प्रवासात नाइलाजास्तव कॉकपिटबाहेर बसावे लागले. सदर विमानातील मुख्य हवाईसुंदरीने एअरलाइनकडे याबाबत तक्रार केली.
आम्ही वैमानिकाचा उड्डाण परवाना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केला आहे. त्याचप्रमाणे या वैमानिकासमवेत कॉकपिटमध्ये अधिक वेळ बसणाऱ्या हवाईसुंदरीलाही आम्ही निलंबित केले आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. वैमानिकाचा परवाना रद्द करण्यात आल्याने त्याच्या विमान उड्डाणावर तात्पुरते र्निबध आले आहेत.