गेल्या दोन आठवड्यात तिस-यांदा हवेत उड्डाण करत असताना विमानातील इंजिनमध्ये बिघाड झालेल्या घटनेला नागरी विमानचालन नियामकाने गांभीर्याने घेतलं असून कारवाईला सुरुवात केली आहे. सोमवारी डीजीसीएने (नागरी विमान उड्डाण महासंचालनालय) 11 विमानांना तात्काळ सेवेतून हटवण्याचा आदेश दिला. यामधील आठ विमानं इंडिगो एअरलाइन्सची आहेत, तर तीन विमाने गोएअरची आहेत. इंजिनांमधील बिघाडामुळे विमानांना सेवेतून बाहेर काढल्याने मंगळवारी अनेक मार्गांवरील सेवांवर परिणाम झालेला पहायला मिळाला.

इंडिगोला आपली 47 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत तर गोएअरची 18 रद्द झाली आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरु, पाटणा, श्रीनगर, भुवनेश्वर, अमृतसर आणि गुवाहाटीसहित अनेक शहरांमधून जाणा-या आणि येणा-या विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे. प्रवाशांना सामोरं जावं लागत असलेल्या समस्यांनंतर इंडिगोने पत्रक काढत, प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी दुस-या विमानाची व्यवस्था केली जात असल्याची माहिती दिली. ‘सर्व प्रभावित प्रवाशांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. एक तर प्रवाशी आपलं तिकीट रद्द करुन सर्व पैसे परत मिळवू शकतात. त्यांना कोणताही चार्ज लावला जाणार नाही. किंवा ते दुस-या विमानाने प्रवाश करु शकतात. त्यांना कोणताही अतिरिक्त अधिभार लावला जाणार नाही’, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

सोमवारी इंडिगोच्या एका विमानातील इंजिनात बिघाड झाल्याने अहमदाबाद विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं. यानंतर काही तासातच डीजीसीएने इंडिगो आणि गोएअरला आदेश दिला की, त्या 11 A320 निओ विमानांना तात्काळ सेवेतून हटवा ज्यांच्यावर प्रॅट अॅण्ड व्हिटनी इंजिनची एख खास सीरिज आहे.

एका खास सीरिजच्या एकूण 14 A320 निओ विमानांना आता सेवेतून हटवण्यात आलं आहे. यामधील 11 इंजिनांचा वापर इंडिगो करत होतं, तर तीन गोएअर वापरत होतं. विशेष म्हणजे याच समस्येमुळे इंडिगोची तीन विमानं याआधी सेवेतून हटवण्यात आली होती.

11 विमानांना सेवेतून हटवण्यात आल्याने आणि उड्डाणं रद्द झाल्याने मंगळवारी देशभरातील अनेक विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. सोमवारीदेखील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागला. इंडिगो प्रत्येक दिवसाला जवळपास एक हजार विमानांचं उड्डाण करतं. इंडिगोकडे डोमेस्टिक फ्लायर्सचा जवळपास 40 टक्के भाग आहे, तर गोएअरकडे मार्केट शेअरचे जवळपास 10 टक्के आहेत.