सांगलीतील अनिकेत कोथळेच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र पोलिसांची नाचक्की झाली असतानाच आता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी केलेल्या पाहणीतून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यात गेलेल्या ५० टक्के तक्रारदारांची तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिला. विशेष म्हणजे हे तक्रारदार सर्वसामान्य नव्हते. डमी तक्रारदार म्हणून पोलीस महासंचालक कार्यालयाने कर्मचाऱ्यांनाच पोलीस ठाण्यात पाठवले होते.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार सांगलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपिन बिहारी यांच्या संकल्पनेतून सर्वेक्षण करण्यात आले. पोलिसांनाच डमी तक्रारदार म्हणून पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. यात महिलांचाही समावेश होता. छेडछाड, विनयभंग अशा स्वरुपाच्या तक्रारी घेऊन या डमी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेल्या. या डमी तक्रारदारांना आलेला अनुभव पोलिसांची पोलखोल करणाराच होता. कपडे नीट घातले पाहिजे, रात्री उशीरा बाहेर फिरु नका, असे फुकटचे सल्ले या महिलांना देण्यात आले. काही पुरुषांनाही डमी तक्रारदार म्हणून पाठवण्यात आले होते. पाकिट, मोबाईल चोरीला गेले, चेन चोरी, बाईक चोरी अशा स्वरुपाच्या तक्रारी घेऊन ते पोलीस ठाण्यात गेले होते. काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची या सर्वेक्षणात मदत घेण्यात आली. दुर्दैवी बाब म्हणजे ५० टक्के तक्रारी घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे या पाहणीतून समोर आले.

सांगलीतील घटनेतही अनिकेत कोथळेच्या कुटुंबाने दोनदा तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासोबतच पोलिसांच्या कार्यशैलीत बदल करण्याचे आव्हानच गृहखात्यासमोर आहे.

तक्रारदाराला मदत पण गुन्हा दाखल नाही
औरंगाबाद जिल्ह्यात एक डमी तक्रारदार मोबाईल आणि पैसे चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. इतकेच काय तर घरी जाण्यासाठी पैसे नाही असे त्या डमी तक्रारदाराने सांगताच पोलिसांनी स्वतःच्या खिशातून पैसेदेखील दिले. मात्र, याप्रकरणात शेवटपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.