अशोकनगर : पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्य़ातील तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वायू उत्पादन क्षेत्रात पश्चिम बंगालला प्रथमच स्थान मिळाले आहे.

प्रधान यांनी सांगितले, की कोलकात्यापासून ४७ कि.मी अंतरावरील पेट्रोलियम साठय़ातून तेल निर्मिती सुरू करण्यात आली असून हे तेल हल्दीया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे शुध्दीकरणासाठी पाठवले जात आहे.

अशोकनगर तेल व वायू साठा क्षेत्रात प्रथमच तेल उत्पादन सुरू झाले असून हा तेल व वायू साठा २०१८ मध्ये सापडला होता. अशोकनगर क्षेत्र हे महानदी-बंगाल-अंदमान खोऱ्यात असून ते व्यावसायिक पातळीवर योग्य आहे. तेल व नैसर्गिक वायू मंडळाने अशोकनगर तेलक्षेत्र शोधण्यासाठी ३,३८१ कोटी रुपये खर्च केले होते. आणखी दोन तेल विहिरींचा शोध चालू असून खुल्या परवाना धोरणा अंतर्गत हे काम होत आहे. अशोकनगर येथील तेलसाठय़ातले तेल उत्तम दर्जाचे आहे. यात व्यावसायिक उत्पादन सुरू होणार असून त्यामुळे पश्चिम बंगालचा महसूल वाढणार आहे तसेच रोजगार निर्मितीतही मदत होईल.