गृह वित्त क्षेत्रातील प्रमुख कंपनी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून (डीएचएफएल) हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. कोब्रापोस्ट या संकेतस्थळाकडून हा आरोप करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी बोगस कंपन्यांच्या आधारे ३१,५०० कोटींचा घोटाळा केला आहे. हे वृत्त समोर येताच डीएचएफएलचे शेअर आठ टक्क्यांनी गडगडले.

डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी बोगस कंपन्यांच्या आधारे हजारो कोटींचा चुना लावला आहे. प्रवर्तकांनी कथित रूपात विविध बनावट आणि छद्म कंपन्यांद्वारे ३१,५०० कोटींचा निधी वळता करून फस्त केल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. डीएचएफएलने बोगस कंपन्यांना कर्ज दिलं असल्याचं दाखवलं आणि नंतर ही रक्कम पुन्हा प्रवर्तकांकडे जमा करण्यात आली. बोगस कंपन्यांची मालकी डीएचएफएलच्या प्रवर्तकांकडेच होती. अशाप्रकारे ३१,५०० कोटींचा घोटाळा करण्यात आला. डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी या पैशांच्या सहाय्याने भारताशिवाय श्रीलंका, दुबई, इंग्लंड आणि मॉरिशसमध्ये संपत्ती खरेदी केली.

जवळपास ३२ भारतीय आणि विदेशी बँकांनी डीएचएफएल समूहाला सुमारे ९७,००० कोटी रुपये कर्जरूपात दिले आहेत. तर हाच पैसा प्रवर्तकांकडून स्थापित छद्म कंपन्यांना कर्जरूपात अदा करून, जवळपास ३१,५०० कोटी रुपये फस्त केले गेले, असा कोब्रापोस्ट या संकेतस्थळाने डीचएफएल समूहावर आरोप केला आहे. बहुतांश छद्म कंपन्यांचे पत्ते, त्यांचे संचालक आणि लेखापरीक्षक एकसारखेच असल्याचेही आरोपात म्हटले गेले असून, हा देशातील सर्वात मोठा वित्तीय घोटाळा असल्याचा या संकेतस्थळाचा दावा आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांमधील संकट पुढे आल्यानंतर, त्याचा गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या समभागांनाही फटका बसला. तेव्हापासून डीएचएफएलच्या समभागांमध्ये ७२ टक्क्य़ांची घसरण दिसून आली आहे. मंगळवारच्या घटनेचा परिणाम म्हणून १८२.८५ या स्तरावरून सुरुवात करीत डीएचएफएलचा समभाग १६१.३० रुपये या वार्षिक नीचांकावर गडगडला. दिवसाचे व्यवहार संपुष्टात आले तेव्हा सोमवारच्या तुलनेत ८.२२ टक्के घसरणीसह तो १६९.७० रुपये पातळीवर स्थिरावलेला दिसून आला.

कोब्रा पोस्टच्या रिपोर्टनुसार, डीएचएफएलने भाजपाला २० कोटी रुपयांचा निधीही दिला होता. मात्र कंपनीने ना यासंबंधी कोणता खुलासा केला ना कुठेही याची नोंद दर्शवली.