स्वादुपिंडाच्या कर्करोगातील मूलपेशींना ऑक्सिजन आधारित चयापचयाच्या क्रियेचा फायदा मिळत असतो, पण त्यांना मधुमेहासाठी वापरल्या जाणाऱ्या एका औषधाने गुदमरवून मारता येते, असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे.

कर्करोगाच्या पेशी या ग्लायकोलिसिस या चयापचयाच्या पद्धतीवर अवलंबून असतात. त्या त्यांच्या ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजन वापरत नाहीत; पण सर्वच कर्करोग पेशी अशा नसतात त्यामुळे त्या चयापचयावर अवलंबून असतात. स्वादुपिंडाच्या कर्करोग मूलपेशी या चयापचयाच्या ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन किंवा ऑक्सफॉस या प्रभावी क्रियेचा वापर करतात. त्यातील ऑक्सिजन निर्मितीचा फायदा कर्करोग पेशींनाही होत असतो.
ऑक्सफॉस या क्रियेत पेशीचा मायटोकाँड्रिया हा भाग वापरला जातो. मधुमेहासाठी वापरल्या जाणाऱ्या मेटफॉरमिन या औषधाने या भागाला लक्ष्य केले जाते. काही स्वादुपिंड कर्करोग मूलपेशी चयापचयाच्या लवचीक तेने उपचारांच्या माऱ्यातूनही सुटून जातात. पण संशोधकांच्या मते या पेशींचा औषधांना होणारा प्रतिरोध मोडून काढता येतो. त्यासाठी या कर्करोगग्रस्त स्वादुपिंड मूलपेशींना ऑक्सफॉस प्रक्रियेतून मिळणाऱ्या ऑक्सिजनचा वापर करण्यापासून रोखले जाते. संशोधकांच्या मते हा नवीन शोध असून त्यामुळे कर्करोगग्रस्त पेशींना ऑक्सिजन वापरता न आल्याने त्या मरतात, तसेच पुन्हा कर्करोगाचा फैलाव शरीरात होत नाही. याची वैद्यकीय चाचणी पुढील वर्षी केली जाणार आहे.
कर्करोगग्रस्त स्वादुपिंड पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचे ऑक्सिजनवरचे अवलंबित्व कमी करून या पेशींना नष्ट करता येते, कारण त्यांचा ऊर्जा पुरवठाच तोडला जातो, असे संशोधक पॅट्रिशिया सांचो यांनी सांगितले. त्या लंडनच्या क्वीनस मेरी विद्यापीठात बार्टस कॅन्सर इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधन करीत आहेत. मधुमेहाचे औषध वापरून कर्करोग उपचार प्रभावी करता येतात, असे त्यांचे म्हणणे आहे.