चीनमध्ये ‘करोना’च्या बळींची संख्या १,७७०

जपानमधील सागरात नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूझ जहाजावरील करोना संसर्ग झालेल्या प्रवाशांची संख्या आता ४५४ झाली असून ९९ जणांच्या चाचण्या सकारात्मक आल्याने ही वाढ झाली आहे.

सोमवारी जपानी प्रसारमाध्यमांनी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एकूण रुग्णांची संख्या ४५४ असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या १४ जणांना विषाणूची लागण झाली होती, तरी त्यांना विमानाने मायदेशी जाऊ देण्यात आले. या १४ जणांचा समावेश या ४५४ मध्ये आहे की नाही हे समजलेले नाही.

डायमंड प्रिन्सेस जहाज हे टोकियोजवळ योकोहामा येथे असून चीनबाहेर करोना रुग्णांची संख्या तेथेच सर्वाधिक आहे. ५ फेब्रुवारीपासून या जहाजावरील प्रवाशांना वेगळे ठेवण्यात आले आहे. जहाजावरील कुणालाच उतरवून घेण्यात आले नाही. त्यांना केवळ  मास्क लावून डेकवर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी विलगीकरणाचा काळ संपत असून काही देशांनी त्यांच्या नागरिकांना परत नेण्याचे ठरवले आहे. अमेरिकेने त्यांच्या प्रवाशांना मायदेशी नेले आहे.

जहाजावरील ३४० अमेरिकी प्रवासी मायदेशी

जपानमध्ये असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील अमेरिकी प्रवाशांना घेऊन आलेले एक विमान कॅलिफोर्नियातील हवाई दलाच्या तळावर सोमवारी उतरले. तेथून सुटका करून आणलेल्या अमेरिकी व्यक्तींना आता विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. त्यांना विषाणूची लागण झालेली नाही याची खात्री पटल्याशिवाय सोडण्यात येणार नाही.

अमेरिकी प्रवाशांना घेऊन हे विमान उत्तर कॅलिफोर्नियातील ट्रॅव्हिस हवाई दल तळावर पहाटे २.३० वाजता उतरले. दुसरे विमान टेक्सास येथे लॅकलँड हवाई दल तळावर उतरणार आहे.

जपानचे संरक्षण मंत्री तारो कोनो यांनी सांगितले, की जपानी लष्करी जवानांनी टोकियोतील हानेडा विमानतळावर एकूण ३४० अमेरिकी प्रवाशांना १४ बसमध्ये नेऊन विमानात बसवले.डायमंड प्रिन्सेस क्रूझ जहाजावर करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जहाजावरील सर्वच प्रवाशांना १४ दिवस वेगळे ठेवण्यात आले होते. पण अमेरिकी प्रवाशांना ही मुदत संपण्यापूर्वीच तेथून हलवण्यात आले आहे. ५ फेब्रुवारीपासून त्यांना वेगळे ठेवण्यात आले होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे,की ज्या प्रवाशांना परत आणण्यात आले त्यात १४ जणांना विषाणूची लागण झालेली आहे पण तरी त्यांना मायदेशी आणण्यात आले कारण त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसत नव्हती. ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत असतात ती व्यक्ती करोनाचा विषाणू पटकन पसरवू शकते पण या रूग्णात लक्षणे नसल्याने त्यांना आणले गेले. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, इटली हे देशही त्यांच्या प्रवाशांना हलवणार आहेत.

सम्राटांचा वाढदिवस समारंभ रद्द

जपानमध्ये करोना रुग्णांची संख्या ६५ झाली असून आता या संसर्गाचा नवा टप्पा सुरू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जपानच्या सम्राटांच्या वाढदिवसाचा रविवारचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. १ मार्च रोजीची टोकि यो मॅरेथॉनही रद्द करण्यात येणार आहे. भारताचे १३२ जण या जहाजावर आहेत. त्यांना परत आणण्याचे आश्वासन  भारतीय दूतावासाने दिले आहे.