जपानमध्ये नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील ५०० प्रवाशांना त्यांचा वेगळे ठेवण्याचा १४ दिवसांचा काळ संपल्याने बुधवारी सोडून देण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांची चाचणी नकारात्मक येणे अपेक्षित आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की बुधवारी सोडून देण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या निश्चित सांगता येणार नाही पण ती अंदाजे ५०० असेल. या जहाजावर एकूण ३७११ जण असून त्यात ५४२ जणांना विषाणूची बाधा झाली आहे. एकूण १३२ भारतीय या जहाजावर आहेत. या जहाजावर वेगळ्या ठेवलेल्या लोकांबाबत वैज्ञानिकांनी शंका व्यक्त केली असून उलट त्यामुळेच विषाणू पसरल्याचा दावा केला आहे. जपान सरकारने मात्र विलगीकरण यंत्रणा प्रभावी असल्याचा दावा केला आहे. जपानचे आरोग्यमंत्री कात्सुनोबू काटो यांनी सांगितले, की प्रवाशांचे नमुने घेऊनच तपासणी करण्यात आली आहे. १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी संपला आहे.

सहा हजार मास्कची चोरी

सहा हजार मास्क जपानमधील एका रुग्णालयातून चोरीस गेले आहेत. ते मास्क शस्त्रक्रियेसाठी आणले होते. पण विषाणूच्या भीतीने मास्कचा तुटवाड असल्याने जपानच्या कोबे येथील रेड क्रॉस रुग्णालयातून मास्कची चार खोकी चोरीस गेली आहेत. अजूनही पुरेसे मास्क असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावर दिली. अनेक दुकानांमध्ये मास्क संपले असून जपानमध्ये चोरीस गेलेल्या मास्कची किंमत ४६५ डॉलर्स होती.