पुलवामातील आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दार याच्याबरोबर संपर्क साधण्यासाठी जैश-ए-मोहम्मदने वायएसएमएस या सॉफ्टवेअर सेवेचा किंवा त्याच धर्तीवर अन्य मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग केला असण्याची शक्यता आहे. मोबाइल फोनवरचे बोलणे इंटरसेप्ट करता येऊ नये यासाठी जैशने या दोन मार्गांनी हल्लेखोराशी संपर्क ठेवला असावा असा जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना अंदाज आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जैशच्या दहशतवाद्यांनी पाठवलेला एका संदेश गुप्तचर यंत्रणांनी इंटरसेप्ट केला असून त्यावरुन वायएसएमएस या सॉफ्टवेअर वापर झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वायएसएमएस हे अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सी मॉडेल असून या सॉफ्टवेअरद्वारे सुरक्षित संदेशाचे आदान-प्रदान करता येते. सेल्युलर फोनला रेडिओ सेट जोडलेला असतो.

फोनमध्ये कुठलेही सीमकार्ड नसते. हा रेडिओ सेट छोटया ट्रान्समीटर सारखा असतो. त्यामध्ये वाय-फायची सुविधा असते. मोबाइलला जोडण्यासाठी या वाय-फायचा उपयोग केला जातो. मेसेज पाठवल्यानंतर तो रिसीव्ह करणाराही ठराविक टप्प्यामध्ये असावा लागतो. साल २०१२ पासून वायएसएमएस डार्क वेबवर उपलब्ध आहे. आता पाकिस्तानातील दहशतवादी गटांनी याची नवी आवृत्ती विकसित केली आहे. जैश आणि लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यामनी या तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. सध्यातरी सुरक्षा यंत्रणांना टेहळणी उपकरणांच्या मदतीने अशा प्रकारचे कम्युनिकेशन इंटरसेप्ट करता आलेले नाही.