१६ व्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ते मायकल नॉस्ट्रेडेमस यांनी बिटकॉईनचा उदय होईल हा अंदाज १६ व्या शतकातच वर्तवला होता का? याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉईन प्रचंड तेजीत आहे. अशातच नॉस्ट्रेडेमसना मानणाऱ्या काही लोकांनी हा अंदाज व्यक्त केला आहे की बिटकॉईनला इतकी उसळी मिळेल हे नॉस्ट्रेडेमस यांना आधीपासून ठाऊक होते.

आजवर नॉस्ट्रेडेमस यांनी व्यक्त केलेले भविष्य बऱ्याच अंशी खरे ठरले आहे असे अनेकजण मानतात. ‘दुसरे महायुद्ध’, ‘अॅडॉल्फ हिटलरचा उदय’ ही त्यांनी वर्तवलेल्या काही भविष्यवाणीची उदाहरणे आहेत. त्यांच्या पुस्तकांनाही जगभरात मोठी मागणी आहे. जगभरातले अनेक लोक नॉस्ट्रेडेमस यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. आता बिटकॉईनला अफाट यश मिळेल असे भविष्य नॉस्ट्रेडेमस यांनी १६ व्या शतकाच वर्तवले होते अशी माहिती समोर येते आहे. एक्स्प्रेस.को.यूके या वेबसाइटने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

एका युजरने या संदर्भातली काही वाक्ये सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत.  ‘एका ख्रिस्ती राष्ट्र शासित देशात सोने आणि चांदी ऐवजी एका अदृश्य चलनाचा पर्याय शोधला जाईल.’ ‘सोने आणि चांदी विरघळवले जाईल’, ‘दोघांपैकी एक माणूस दुसऱ्याला खाईल’, ‘शहरातील सर्वात मानांकिताला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.’ अशा प्रकारची काही वाक्ये एका युजरने व्हायरल केली. नॉस्ट्रेडेमस यांना बिटकॉईन येणार आणि त्याआधारे अर्थव्यवस्थेत मोठ्या घडामोडी घडणार याचा अंदाज तेव्हाच आला होता असे या युजरने या वाक्यांचा हवाला देत म्हटले आहे.

२००८ मध्ये निर्माण झालेल्या आर्थिक संकटानंतर वॉल स्ट्रीटसाठी २००९ मध्येच बिटकॉईन हे एक आव्हान म्हणून उभे राहिले. या डिजिटल टोकनचे निर्मात्यांचा समूह ऑनलाइन आहे. म्हणजेच तो एक प्रकारे अदृश्य आहे असेच म्हणता येईल. नॉस्ट्रेडेमस यांनी याही प्रकारचे एक वाक्य लिहिले आहे असेही म्हटले जाते आहे. बिटकॉईनच्या तुफान यशानंतर या बिटकॉईनचा आणि नॉस्ट्रेडेमस यांच्या वाक्यांचा संदर्भ एकमेकांशी जोडला जातो आहे. या दोन्हीमध्ये काही संदर्भ असेलच असे नाही तरीही नॉस्ट्रेडेमस यांना बिटकॉईनबाबत ठाऊक होते त्यांनी याबाबतचा अंदाज वर्तवला होता अशी चर्चा होताना दिसते आहे.