भारतरत्न जाहीर करण्यात आलेले रसायनशास्त्रज्ञ प्रा.सीएनआर राव यांनी सरकारवर टीका करणारी जी भडक वक्तव्ये केली होती त्यावर आता त्यांनी रंगसफेदी करून सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपल्याकडील मूर्खपणाच्या स्थितीत विज्ञानाला पुरेसा निधी मिळू शकला नाही असे ते आज म्हणाले. ब्रिटनमध्ये संसदेत इडियट (मूर्ख) हा शब्द सर्रास वापरला जातो मग आपल्याकडे असा शब्द वापरल्यास आपण अस्वस्थ का होतो, असा सवालही त्यांनी केला आहे.
त्यांनी काल राजकीय नेते मूर्ख असल्याचे सांगून विज्ञानाला काहीच निधी मिळाला नाही अशी परखड टीका केली होती, त्याबाबत स्पष्टीकरण करताना त्यांनी बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला व राजकीय नेत्यांना आपण मूर्ख म्हटलो नाही असा खुलासाही केला. भारतरत्न मिळाल्यानंतर काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी परखड मते व्यक्त केली होती. ते नेहमीच अशा प्रकारे मते व्यक्त करतात परंतु भारतरत्न मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी असे वक्तव्य करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जयपाल रेड्डी यांनी असे सांगितले की, देशात वैज्ञानिक संशोधनासाठी जो निधी दिला जायला पाहिजे तो दिला जात नाही, हे राव यांचे म्हणणे आम्हाला मान्य आहे. आपली गुंतवणूक चांगली आहे पण काहीशी मूर्खपणाची आहे असे आपण म्हणालो, पण ते संतापाने बोललो नाही. काही वेळा दुर्दैवाने आपल्याला अग्रक्रम कळतच नाहीत एवढेच आपल्याला सांगायचे होते असे त्यांनी स्पष्टीकरण करताना सांगितले.
तो संताप नव्हता, आपण कुणाला मूर्ख म्हणालो नाही, त्यामुळे या वेगळ्या बाबी आहेत. जी भाषा आपण वापरली तशी ती वापरायला नको होती. आता पुन्हा तसा शब्द वापरणार नाही. कुणालातरी मूर्ख म्हटले असा याचा अर्थ घेतला जाईल याची आपल्याला कल्पना नव्हती. आपण कुणालाही मूर्ख म्हटलेले नाही.
पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे प्रमुख असलेल्या राव यांनी आसे म्हटले होते की,मूर्ख राजकारण्यांनी आम्हाला कमी निधी दिला, सरकारने जो निधी दिला त्याचा वापर करून आम्ही बरेच काम केले आहे. विज्ञान क्षेत्राला २० ते ३० टक्के निधी संशोधनासाठी दिला जातो असे ते म्हणाले.
खरे म्हणजे त्यांना विज्ञानाचे महत्त्व कळायला हवे व त्यात आमच्या गरजेइतकी गुंतवणूक करायला हवी होती तशी ती केली तरच भारत प्रगतीने उजळून निघेल.
ब्रिटनच्या संसदेत जेव्हा इडियट हा शब्द वापरला जातो असे सांगून ते म्हणाले की, तिथे अशा शब्दांनी कुणी दुखावले जात नाही, येथे तुम्ही अस्वस्थ का होत आहात हे समजत नाही.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जयपाल रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे आज पत्रकारांना सांगितले की, विज्ञान संशोधनासाठी पुरेसा निधी मिळत नाही या राव यांच्या मताशी आपण सहमत आहोत. कारण विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व मोठे असून सरकार त्याकडे जेवढे लक्ष द्यायला पाहिजे तेवढे देत नाही.