पाणबुडीतून प्रक्षेपित करता येणाऱ्या आणि अणवस्त्रे वाहून नेऊ शकणाऱ्या बाबर-३ या क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल पाकने केलेला दावा खोटा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराकडून या क्षेपणास्त्राच्या चाचणीचा खोटा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. उपग्रह प्रतिमा विश्लेषकांच्या मते पाकचा दावा खोटा असून त्यांनी ग्राफिक्सच्या सहाय्याने हा व्हिडिओ तयार केला आहे. बाबर-३ ची चाचणी यशस्वी झाली हे दाखविण्यासाठी संगणकनिर्मित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्षेपणास्त्राची आभासी प्रतिमा तयार करण्यात आली आहे. पाककडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओत सुरूवातीला क्षेपणास्त्राचा रंग पांढरा आहे, त्यानंतर तो केशरी होत आहे. याशिवाय, क्षेपणास्त्राचा वेगही कमालीचा आहे, असे निवृत्त कर्नल विनायक भट यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
#Pakistan #SLCM #Babur3 Fake video clip uses CGI. Geo-location coming up shortly. https://t.co/26ysrUQDrc
— RAJ (@rajfortyseven) January 9, 2017
#Pakistan #SLCM #Babur3 Geo-located CGI 25°20'13"N 64°53'18"E. Missile moves 15kms in 8sec speed 6750kmph. pic.twitter.com/Dc3TV6zVvd
— RAJ (@rajfortyseven) January 9, 2017
#Pakistan #SLCM #Babur3 Geo-located CGI 25°20'13"N 64°53'18"E. Missile moves 15kms in 8sec speed 6750kmph. pic.twitter.com/Dc3TV6zVvd
— RAJ (@rajfortyseven) January 9, 2017
हिंदी महासागरातील अज्ञातस्थळी ही चाचणी घेण्यात आली होती. बाबर-३ ही जमिनीवरून डागता येणाऱ्या बाबर-२ या क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती असून त्याचा पल्ला ४५० किलोमीटर (२८० मैल) इतका आहे. त्यात शत्रूच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांना चकवा देण्यासाठी सागरी पृष्ठभागाच्या अगदी जवळून उडण्याची क्षमता आणि काही प्रमाणात स्टेल्थ तंत्रज्ञान आहे. तसचे पाण्यात प्रज्वलित होऊन गती देणारी यंत्रणा व उत्कृष्ट दिशादर्शन यंत्रणा आहे, अशी माहिती पाकिस्तानी सेनादलांच्या प्रसिद्धी विभागाने दिली होती. भारताच्या वाढत्या अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र सज्जतेला तोंड देण्यासाठी ही चाचणी घेतल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. भारताने काही दिवसांपूर्वी शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. त्यावर पाकिस्तानने गंभीर चिंता व्यक्त केली होती. युद्धप्रसंगी पाकिस्तानची जमिनीवरून डागली जाणारी अणवस्त्रधारी क्षेपणास्त्रे भारताने हवेतच नष्ट केली तर दुसरा हल्ला चढविण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून (सेकंड स्ट्राइक कपॅबिलिटी) पाकिस्तानसाठी या क्षेपणास्त्राचे महत्त्व आहे.
दरम्यान, बाबर-३ च्या यशस्वी चाचणीनंतर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, भारताने यापूर्वीच म्हणजे २००८ मध्येच पाणबुडीवरून सोडण्यात येऊ शकणाऱ्या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. याशिवाय, २०१३ मध्ये भारताने पाणबुडीवरून डागण्यात येणारे क्रुझ क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश मिळवले होते. काही दिवसांपूर्वीच भारताने संपूर्ण चीनला टप्प्यात आणणाऱ्या अग्नी-४ व अग्नी-५ या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली होती. याबाबत चीनने नाराजी व्यक्त करताना भारताने अण्वस्त्रे आणि लांबपल्ल्याची क्षेपणास्त्रे याबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या मर्यादा ‘तोडल्या’ असून, पाकिस्तानलाही हाच विशेषाधिकार’ दिला जायला हवा असे म्हटले होते. ५ हजार किलोमीटरचा मारा करण्याची क्षमता असलेले अग्नी-५ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र चीनच्या मुख्य भूमीवरील सर्व भागांपर्यंत पोहचू शकत असल्यामुळे त्याचे वर्णन चीनला लक्ष्य करणारे सामरिक महत्त्वाचे क्षेपणास्त्र असे केले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 6:30 pm