काँग्रेस पक्ष सत्ता गेल्याने सैरभैर झाला आहे, या पक्षाचे संतुलन बिघडले आहे का असाच प्रश्न मला पडतो आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सत्ता गेल्याने त्यांचा तोल ढासळतोय त्यामुळे विकासावर चर्चा करण्याऐवजी हा पक्ष आरोपांची चिखलफेक करण्यात धन्यता मानतोय अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भोपाळमध्ये भाजपाचा सर्वात मोठा मेळावा आयोजित करण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे. याच मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर राफेल करारावरून सातत्याने टीका केली आहे. या टीकेचा समाचार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा तोल ढासळल्याचे म्हटले आहे. काँग्रेस पक्ष छोट्या पक्षांना सोबत घेतो आहे, त्यातही त्यांना फारसं यश येत नाही. मग त्यांनी देशाबाहेर जाऊन कोणी आपल्याशी हातमिळवणी करतं का हे चाचपण्यास सुरूवात केली आहे. आता भारताचा पंतप्रधान कोण असेल हे जगातले देश ठरवणार का? काँग्रेसने माझ्यावर चिखलफेक करण्यासाठी सगळे अपशब्द वापरले. माझ्या विरोधात या पक्षाने सगळे शिव्या-शाप वापरून झाले एकही अपशब्द वापरण्याचा शिल्लक ठेवला नाही. काही राहिले असेल तर तेही म्हणून टाका त्याबद्दल तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या असाही टोला पंतप्रधानांनी लगावला. तुम्ही कितीही चिखलफेक केली तरीही कमळ फुललेलेच राहिल हे लक्षात असू द्या असेही मोदींनी सुनावले आहे.

 

ट्रिपल तलाकला बंदी घालण्यात आली त्याबाबतही काँग्रेसने टीका केली. इस्लाम स्वीकारलेल्या देशांमध्येही ट्रिपल तलाकला बंदी घालण्यात आली आहे. मग भारतात ही बंदी घातली तर यांची ओरड का? मुस्लिम भगिनींशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काँग्रेसला घेणेदेणे नाही का? असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केला आहे. व्होट बँकेचे राजकारण  म्हणून काँग्रेस प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत असल्याचाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you lose your mind too after losing power ask pm narendra modi to congress
First published on: 25-09-2018 at 15:42 IST