गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सोमवारी उच्चांक गाठला. सोमवारी दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या दरांनुसार डिझेलचा दर प्रतिलीटर ६१.७४ रुपयांवर पोहोचला. तर पेट्रोलने ७१ रूपयांचा टप्पा ओलांडला. तेल कंपन्यांच्या दर तक्त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेल मुंबईत महाग मिळते. त्यामुळे सध्या मुंबईत प्रती लीटर डिझेलची किंमत ६५.७४ रूपयांवर पोहोचली आहे.

१२ डिसेंबर २०१७ पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. १२ डिसेंबरला दिल्लीत डिझेलचा दर ५८.३४ रुपये इतका होता. याची तुलना करायची झाल्यास गेल्या महिन्याभरात डिझेलच्या प्रती लीटर दरात ३.४० रुपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलची किंमत २.०९ रूपयांनी वाढली आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे भारतामधील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे आता सरकारवर पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात ऑक्टोबर २०१७ मध्ये दोन रूपयांची कपात करण्यात आली होती. तेव्हा डिझेलचा दर ५९.१४ तर पेट्रोलचा दर ७०.८८ रुपये होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी होऊन अनुक्रमे ५६.८९ आणि ६८.३८ रूपयांवर पोहोचली होती. मात्र, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत गेल्याने अबकारी करातील कपातीचा फायदा नाहीसा झाला आहे. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.