News Flash

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीतावेळी अपंगांना उभे राहण्याची सक्ती नाही: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रगीतासंदर्भातील निर्णयात कोणताही बदल करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

अपंगांना राष्ट्रगीतावेळी उभे राहण्यात सर्वोच्च न्यायालयाने सूट दिली आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. तसेच चित्रपटगृहातील प्रेक्षकांनी उभे राहणे सक्तीचे केले होते. मात्र, त्यातून अपंगांना दिलासा देण्यात आला आहे. राष्ट्रगीतावेळी अपंगांना उभे राहण्याची सक्ती नाही, असे आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय राष्ट्रगीतासंदर्भातील निर्णयात कोणताही बदल करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

चित्रपटगृहाचे दरवाजे राष्ट्रगीतावेळी बंद ठेवण्याचा आदेशही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रगीत वाजवताना शांतता आणि शिस्त राखण्यात यावी, यासाठी हा निर्णय दिला आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रगीत सुरू असताना प्रेक्षकांनी चित्रपटगृहातून बाहेर पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून दरवाजा बाहेरून बंद करण्याबाबत न्यायालयाने काहीही सांगितले नाही, असेही न्यायालयाने सांगितले आहे. केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांनी या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

महोत्सवात सहभागी होणाऱ्या १५०० परदेशी पाहुण्यांना निर्णयामधून सूट देण्यात यावी, अशी मागणी आयोजकांनी याचिकेत केली होती. पण परदेशी पाहुण्यांना देशाच्या सन्मानासाठी राष्ट्रगीतावेळी उभे राहण्यात कोणतीही अडचण नसावी, असे स्पष्टपणे सांगत आयोजकांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली.सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरला दिलेल्या आदेशात व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रगीताच्या वापरावर बंदी आणली आहे. राष्ट्रगीत ५२ सेकंदामध्येच वाजले पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले आहे. या प्रकरणी १४ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर चित्रपटगृहातील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 8:24 pm

Web Title: differently abled dont have to stand up for national anthem at cinemas sc
Next Stories
1 जयललितांचे स्मारक बांधण्यासाठी ‘त्या’ने सोडली पोलिस खात्यातील नोकरी
2 नोटाबंदी: देशवासियांनो, सावध राहा; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ‘इशारा’
3 दिल्लीत अॅक्सिस बँकेत ४४ बनावट खात्यांमध्ये १०० कोटी जमा
Just Now!
X