News Flash

निवडणूक चिन्हांवर डिजिटल साधनांचा प्रभाव

१९८ मुक्त चिन्हे उमेदवारांना उपलब्ध

(संग्रहित छायाचित्र)

१९८ मुक्त चिन्हे उमेदवारांना उपलब्ध

लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. १९८ निवडणूक चिन्हे ‘मुक्त चिन्हे’ घोषित करण्यात आली असून त्यामध्ये डिजिटल साधनांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. ती चिन्हे वगळून आणि नव्याने मुक्त चिन्हांचा समावेश करून या निवडणुकीत १९८ मुक्त चिन्हे अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २०१४ च्या निवडणुकांमध्ये ८७ मुक्त चिन्हे होती. आयोगाने नवीन मुक्त चिन्हांमध्ये दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रांतील साधनांचा समावेश केला आहे. जुन्या काळातील वाळूचे घडय़ाळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाईपरायटर, डिझेल पंप तर आजच्या आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राइव्ह, रोबोट, हेडफोन यांचा समावेश निवडणूक चिन्हांमध्ये आहे.

त्याचबरोबर टूथब्रश, टूथपेस्ट, रेझर, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे. मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचाही समावेश करण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रालाही मुक्त चिन्हांमध्ये स्थान आहे. त्यामध्ये ऊस लागवड करणारा शेतकरी, नारळाची बाग, डिझेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वयंपाकघरातील वस्तूही चिन्ह रूपाने निवडणुकीत अवतरल्या आहेत. गॅस सिलेंडर, गॅस शेगडी, फ्रिज, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, फ्राय पॅन, काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता अशी निवडणूक चिन्हे आहेत.

तर भाज्यांपैकी ढोबळी मिरची, कोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नास्पती(पीअर्स), फणस, अननस, अक्रोड, बिस्किट, ब्रेड, केक आदींचा समावेश मुक्त चिन्हांमध्ये आहे.

वाहतुकीच्या साधनांपैकी रिक्षा, ट्रक, हेलिकॉप्टर, जहाज अशी रस्ते तसेच जलवाहतुकीची साधने, विटा, थापी, करवत, कडी, कुलपाची चावी असे बांधकाम साहित्य, बॅट, बुद्धिबळ पट, कॅरम बोर्ड, फुटबॉल, ल्युडो, स्टम्प, हॉकी स्टिक आणि बॉल, टेनिस रॅकेट आणि बॉल अशी खेळांची साधने यांचा समावेश मुक्त निवडणूक चिन्हांमध्ये आहे.

तसेच क्रिकेट खेळातील फलंदाज, फुटबॉल खेळाडू, मोत्यांचा हार, हिरा, अंगठी असे मौल्यवान दागिने, हार्मोनियम, सितार, व्हायोलीन अशी संगीताची साधने यांच्यासोबतच अनेक विविध क्षेत्रांतील चिन्हेही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 12:23 am

Web Title: digital media impact on election symbols
Next Stories
1 रायगडमध्ये प्रचारात अंतुलेच केंद्रस्थानी
2 राहुल यांनी वायनाडच का निवडले?
3 गांधीजींनाही ‘चौकीदार’ अभिप्रेत!
Just Now!
X