इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो.

ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत २०१८-१९ मध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. याआधीच्या वर्षांत या वर्गवारीसाठी ४५० अर्ज आले होते. ही संख्या आता ६५० वर गेली आहे. भारतातून व्हिसासाठी येणारे अर्ज हे विविध क्षेत्रांसाठी असतात, असे ‘टेक नेशन’ने निदर्शनास आणले आहे.

याविषयी याच आठवडय़ात ‘टेक नेशन’चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तंत्रज्ञानविषयक व्हिसासाठी येणारे सर्वाधिक अर्ज हे यंदाही भारत आणि अमेरिकेतून आले आहेत. यात सॉफ्टवेअर अभियंते, या क्षेत्रातील उद्योक विकासक, एआय-मशीन लर्निग, फिनटेक-एन्टरप्राईज, क्लाऊड सेक्टर यांचा समावेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

तंत्रज्ञान व्हिसासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्ज करणाऱ्यांत नायजेरिया, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे.  २०१४ पासून टेक नेशन व्हिसासाठी एक हजार ६५०हून अधिक अर्ज आले होते.

आजही जगभरातील प्रज्ञावंतांचा ओढा हा ब्रिटनकडेच आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांचे त्यासाठी आभार मानावे लागतील. याचबरोबर आर्थिक सुविधा, संशोधनाची प्रदीर्घ परंपरा याचाही यात मोलाचा वाटा आहे.    – मार्गोट जेम्स, डिजिटल आणि निर्माण उद्योग विभागमंत्री, इंग्लंड