भोपाळ : इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या कथित दाव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘‘अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयास पाठिंबा देण्याच्या बदल्यात केंद्र सरकारने आपल्याला भारतात परतण्यास मुभा देण्याचा प्रस्ताव दिला होता, असा दावा नाईक याने केला असून, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे’’, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी बुधवारी केली. दिग्विजय सिंह यांनी याबाबतची नाईक याची चित्रफीत ट्विटरवर प्रसारित केली.

नाईक याने दूरचित्रवाणी वाहिनीच्या माध्यमातून इस्लामचा प्रसार केला असून तो काळा पैसा व भारतात दहशतवाद माजवणारी प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपावरून पोलीस त्याच्या मागावर आहेत. तो २०१६ मध्ये भारतातून मलेशियात गेला आहे. झाकीर नाईक याने अलीकडे असा दावा केला की, नरेंद्र मोदी सरकारच्या प्रतिनिधीने मलेशियात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपली भेट घेऊन जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास पाठिंबा देण्याच्या  बदल्यात भारतात परतण्यासाठी अभयदान दिले होते.

दिग्विजय सिंह यांनी बुधवारी ट्विटर संदेशात नाईक याने हा दावा ज्यात केला आहे ती चित्रफीत प्रसारित केली असून असे म्हटले आहे की पंतप्रधान व गृहमंत्री यांनी जर झाकीर हुसेनचे हे वक्तव्य फेटाळळे नाही तर देशद्रोही असलेल्या झाकीर नाईकने केलला आरोप खरा आहे, असे स्पष्ट होईल.

नंतर इंदूर येथे दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, नाईक याने चित्रफितीच्या माध्यमातून मोदी व शहा यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये दूत पाठवल्याचे म्हटले असून त्या वेळी जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्याला भारतात सुरक्षित पुन्हा प्रवेश देण्याचा प्रस्ताव सरकारच्यावतीने मांडण्यात आला होता. जर मोदी व शहा यांनी झाकीर नाईक याला आधीच देशद्रोही ठरवले आहे तर त्यांनी त्याने केलेल्या विधानाचा इन्कार करावा. त्यांनी अजून हा आरोप का फेटाळला नाही? अशी विचारणा सिंह यांनी केली.