सध्या मध्य प्रदेशात खुर्चीवरुन राजकारण सुरु असताना आता एक नवा किस्सा चर्चेला आला आहे तो म्हणजे ब्रीजचा. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी अद्याप पाच महिन्यांचा अवधी आहे. मात्र त्याआधी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह मात्र चांगलेच चर्चेत आले आहे. त्यासाठी कारण ठरलं आहे त्याचं एक ट्विट. दिग्विजय सिंह यांनी पाकिस्तानमधील दुरावस्था झालेल्या एका पुलाचा फोटो भोपाळमधील पुलाचा असल्याचं सांगत ट्विटरवर शेअर केला होता.

दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट केलं आणि काँग्रेस अडचणीत आलं. भाजपालाही आयती संधी चालून आली होती,. राज्यमंत्री विश्वास सारंग यांनी थेट सुभाष नगर रेल्वे पूल गाठला आणि कुठे तडे गेलेत का याचा शोध घेण्यास सुरुवात केली. हातात दुर्बिण घेऊन विश्वास सारंग यांनी वरपासून खालपर्यंत पुलाची पाहणी केली पण त्यांना कुठेच तडे गेलेले दिसले नाहीत.

‘दिग्विजय सिंह पाकिस्तानचे समर्थक आहेत. म्हणून राज्यातील प्रगती त्यांना दिसत नाहीये, पण रावळपिंडीमधला तुटलेला पूल मात्र दिसतोय’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीये.

दिग्विजय सिंह यांच्या चुकीवर अनेक काँग्रेस नेत्यांनी शांत राहणंच पसंत केलं. काँग्रेस मीडिया कमिटीचे चेअरमन मानक अग्रवाल यांनी पुढे येत, जेव्हा काँग्रेस नेता चूक करतो तेव्हा तो लगेच त्याची दखल घेत माफी मागतो. भाजपा नेता कधीच माफी मागत नाहीत असा टोला त्यांनी लगावला.

दिग्विजय सिंह यांनी शनिवारी पूलाचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. ‘हा सुभाष नगर रेल्वे क्रॉसिंगचा पूल आहे. अजून बांधकामही सुरु झालेलं नाही आणि तडे जायला लागलेत. यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. भाजपा नेत्याच्या नेतृत्वाखाली पुलाचं काम झालेलं असताना इतका बेजबाबदारपणा कशासाठी ?’, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी विचारला होता. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी आपण पोस्ट करण्याआधी तपासायला हवं होतं असं म्हणत माफी मागितली.