डायनॉसॉर, मॅमथ (महाकाय हत्ती) यांच्यासह पृथ्वीच्या जीवसृष्टीचा गळा घोटणारी ६.५  कोटी वर्षांपूर्वीची नैसर्गिक आपत्ती ही लघुग्रहाच्या स्फोटामुळे झाली होती, या समजाला छेद देणारे संशोधन समोर आले आहे. त्यानुसार लधुग्रहामुळे नाही, तर द्रूतगतीने पृथ्वीवर धूमकेतू आदळून पृथ्वीवरील जीवसृष्टीची वाताहत झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवे काय?
मेक्सिकोतील १८० कि.मी.चे चिक्सक्लब विवर हे डायनॉसॉर ज्या आघातात मरण पावले त्यामुळेच तयार झालेले आहे. त्यातच पृथ्वीवरील ७० टक्के प्रजाती नष्ट झाल्याचे मानले जाते. हे विवर पूर्वी कल्पिल्यापेक्षा अधिक वेगवान, पण लहान पदार्थाच्या आघाताने बनले असावे असे वूडलँड येथील ल्युनर अँड प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आले. टेक्सासमधील द वूडलँड्स येथे ही परिषद चालू आहे.
संशोधन काय?
क्रॅटेशियस व पॅलिओजीन या कालावधीच्या सीमेवर पृथ्वीवरील भूस्तरीय रचनांमध्ये इरिडियमचा समावेश झाला व ते पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या कधीच नव्हते. नवीन अभ्यासानुसार नेहमी सांगितले जाणारे इरिडियमचे प्रमाण चुकीचे आहे. याच आघाताने पृथ्वीवर आलेल्या ओसमियमशी वैज्ञानिकांनी तुलना केली. त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला, की अंतराळातील खडकामुळे एवढा मोठा ढिगारा तयार झाला नसावा त्यापेक्षा त्याची व्याप्ती कमी असावी. थोडक्यात, जी अवकाशीय वस्तू पृथ्वीवर आदळली ती लहान आकाराची असावी, असे लाइव्ह सायन्सने या संशोधनाआधारे दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
विशेष काय?
लहान खडकाने चिक्सक्लबसारखे मोठे विवर तयार झाले याचा अर्थ त्याचा वेग जास्त असला पाहिजे. ज्या धूमकेतूंना सूर्याभोवती फिरण्यास लाखो वर्षे लागतात, त्या धूमकेतूंसारखाच या धूमकेतूच्या आघाताचा परिणाम होता. आतापर्यंत हे विवर लघुग्रहाच्या आघाताने तयार झाल्याचे मानले जात होते, पण ते वेगवान पदार्थाच्या आघाताने तयार झालेले आहे, पण धूमकेतू हे सर्वात वेगवान अवकाशीय घटक आहेत असेही संशोधकांचे म्हणणे आहे.