देवयानी खोब्रागडे यांच्या घरातील मोलकरीण ‘गायब’ झाल्यावर तिचा शोध घेण्यासाठी अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून तेथील अधिकाऱय़ांना असंख्य पत्रे पाठवली. मात्र, अमेरिकेने त्याची दखलच घेतली नसल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली. एकीकडे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी खोब्रागडे यांना अटक केल्याप्रकरणी माफी मागितली असताना, आता भारताने अमेरिकेविरुद्ध आक्रमक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, खोब्रागडे अटकप्रकरणी नक्की काय घडले, याचा आढावा घेण्यात येईल, असे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जय कार्ने यांनी स्पष्ट केले. खोब्रागडे यांना अटक करण्याचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
खोब्रागडे यांना अटक करण्यात आल्यानंतर त्याविरोधात संतापजनक प्रतिक्रिया भारतात उमटली. यानंतर भारतानेही अमेरिकी दूतावासातील अधिकाऱयांच्या विशेष सुविधांवर गदा आणली. अधिकाऱयांची ओळखपत्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर त्यांचे विमानतळ पासही रद्द करण्यात आले.
खोब्रागडे यांच्या घरातील मोलकरीण ‘गायब’ झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी आणि खोब्रागडे यांना ब्लॅकमेल करण्यापासून तिला रोखण्यासाठी अमेरिकेतील गृह खात्याला अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असे अमेरिकेतील भारतीय दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. संबंधित मोलकरणीची बाजू उचलून धरणाराच पत्रव्यवहार अमेरिकेकडून करण्यात आला, असेही दूतावाने स्पष्ट केले.