चीनसोबतचा प्रश्न भारताने चर्चेनेच सोडवायला हवा असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. भारत आणि चीनदरम्यान सुरु असणाऱ्या संघर्षासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी सध्या हा प्रश्न लष्करी मार्गाने सोडवण्याची वेळ नसल्याचा सल्लाही मोदी सरकारला दिला आहे. पवारांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत शरद पवार यांनी हे मत व्यक्त केलं.

“आपण लडाखमध्ये सैन्य नेत आहेत वगैरे पाहिलं मी. नरवणेंचं वक्तव्य पण पाहिलं मी. वेळ आली तर करु आपण करायचं आहे ते. त्याची काय किंमत द्यायचीय ती देऊ पण आज लष्करी शक्तीनं हा प्रश्न सोडवण्याची वेळ नाही हे लक्षात घ्यायचा हवं,” असं मत पवारांनी व्यक्त केलं. “मी चीन प्रश्नावर राजकारण आणू नका असं सांगतोय कारण प्रश्न गंभीर आहे. आपण लष्कर पाठवा असं सांगू शकतो. हल्ले करु शकतो. पण त्याला जे उत्तर दिलं जाईल त्याची किंमत देशाला मोजावी लागेल. मात्र वेळ आल्यावर तो ही निर्णय घेतला जाईल. सध्या तरी हल्ला करण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा,” असा सल्ला पवारांनी दिला आहे. मात्र चीनने आपल्या भागात घुसून जवानांवर हल्ला केला असेल तर भारताला निश्चित कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. तसेच ही भूमिका वेळोवेळी घेतली पाहिजे, असं मत पवारांनी व्यक्त केलं.

गळाभेट घेऊन काही होत नाही…

भारत आणि चीनमधील वादासंदर्भात राऊत यांनी प्रश्न विचारला असता पाकिस्तानपेक्षा भारतासाठी चीन अधिक धोकादायक असल्याचे मत पवारांनी व्यक्त केलं. चीनची ताकद पाहता पाकिस्तानपेक्षा भारतासाठी चीनच अधिक अडचणी निर्माण करु शकतो असं पवार म्हणाले. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु आहे हे दाखवण्यासाठी मोदी सरकारने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भारत दौऱ्यावर बोलवून केलेल्या प्रयत्नांनी प्रश्न सुटणार नसल्याचा टोलाही पवारांनी लगावला. “सारखे कपडे शिवून, झोपाळ्यावर बसणं, गळाभेट घेणं ठीक आहे, शेक हॅण्ड करणं ठिक आहे पण त्याने प्रश्न सुटत नसतात,” अशा शब्दांमध्ये पवारांनी शी जिनपिंग भेटीवरुन मोदी सरकारला टोला लगावला .

नक्की वाचा >> “उद्या भारतासमोर संकट आलं तर…,” पवारांनी सांगितला चीनमधील समुद्रकिनाऱ्यावरील गप्पांचा ‘तो’ किस्सा

चीनने शेजाऱ्यांना आपल्या बाजूने केलं

चीनने भारताच्या सर्व शेजारी देशांना आपल्या बाजूने केलं असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. “चीनने काय केलं भारताच्या शेजारी सर्व देशांना आपल्या बाजूने केलं आहे. पाकिस्तान तर चीनच्या बाजूने आहेच. मात्र ज्या बांगलादेशची निर्मिती आपण केली तो बांगलादेश आणि हिंदू प्रदेश म्हणून ओळख असणारा नेपाळही चीनच्या बाजूने गेला. खाली श्रीलंकाही चीनच्या बाजूने आहे. एकंदरितच चहू बाजूने आपल्या शेजऱ्यांना चीनने आपल्या बाजूनं केलं आहे. त्या देशांकडून भारतविरोधी भूमिका ऐकायला मिळते. हे अलीकडच्या काळातलं योगदान आहे,” असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

भारताचं परराष्ट्र धोरण चुकतयं का?

भारताचं परराष्ट्र धोरण चुकत आहे का असा प्रश्न राऊत यांनी विचारला असता पवारांनी नाही असं उत्तर दिलं. मात्र नेहरु, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालावधीमध्ये परराष्ट्रधोरणात काही बदल झाला नाहीय, असंही पवारांनी यावेळी नमूद केलं.

…म्हणून गलवानमध्ये गोळीबार झाला नाही

“१९९३ साली मी संरक्षणमंत्री म्हणून चीनला गेलो तेव्हा आम्ही चीनशी एक करार केला. त्या कराराचा मसूदा असा होता की लडाख आणि परिसरात दोन्ही देशांमध्ये संघर्ष नको. एखाद्या दुसऱ्या गोष्टीवर वाद झालाच तर तेव्हा बंदूका वापरायच्या नाहीत असं ठरलं होतं. म्हणूनच लडाखमध्ये झालेल्या संघर्षामध्ये फायरिंग झाली नाही,” असं पवार म्हणाले.

नक्की वाचा >> शरद पवार म्हणतात, “पाकिस्तान नाही चीनच भारताचा सर्वात मोठा शत्रू, कारण…”

नेहरु आणि इंदिरा गांधीवर टीका करण्यासंदर्भातील प्रश्नावर पवार म्हणतात…

काहीही झालं की सध्याचं सरकार नेहरुन आणि इंदिराजींकडे बोटं दाखवतं यासंदर्भात राऊतांनी प्रश्न उपस्थित केला. “स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारत आणि चीनमध्ये संघर्ष नव्हता. चांगले सलोख्याचे संबंध होते. नेहरुंनीही चीन भविष्यात महासत्ता होणार असल्याचे हेरल्याने त्यांनी सहकार्याची भूमिका स्वीकारली होती. दोन्ही देशांना हा संघर्ष परवडणारा नव्हता हे नेहरुंनी हेरलं होतं,” असं पवार म्हणाले.

चीनची भूमिका चुकली

“लडाखमध्ये आपण एक रस्ता करायला घेतला असून त्याच्या दुसऱ्या बाजूला चीन आहे. आपल्या हद्दीतून हा रस्ता करतोय त्यामुळे यात वाद निर्माण होण्याचं कारण नाही. मात्र चीननं तिथं धक्काबुक्की केली ती योग्य नाही,” असं म्हणत पवारांनी चीनची भूमिका चुकल्याचे अधोरेखित केलं.

ती जमीन कधीच चीनने घेतलीय, राहुल यांना टोला

चीन आत घुसलाय जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय का यासंदर्भात प्रश्न विचारला असता पवारांनी ही जमीन ५० वर्षांपूर्वीच ताब्यात घेतली होती असं सांगितलं. “ती जमीन आज ताब्यात घेतली नाही. ताब्यात घेतलेली अक्साई चीनची जमीन घेतली ताब्यात नेहरुंच्या कालखंडामध्ये घेतली आहे. राहुल गांधी जमीन घेतली हे सांगत आहेत ते खरंय पण ती आता नाही घेतली ५० वर्षांपूर्वी घेतलीय. तो वाद सीमेचा आहे,” असं म्हणत पवारांनी राहुल गांधींचा आरोप खोडून काढला आहे. तसेच पुढे बोलताना पवारांनी चीनने ताब्यात घेतलेली जाग एका दिवसात आपण परत आणू शकत नाही. त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. चर्चेने अन्य देशांच्या माध्यमातून दबाव आणून हा प्रश्न सोडवला पाहिजे असं मत व्यक्त केलं.