कायम महासत्तेचा तोरा आणि आपण करू तोच कायदा असा टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेला भारताने देवयानी खोब्रागडे अटक प्रकरणावरून जशास तसे उत्तर दिले आहे. भारतातील सर्व अमेरिकी दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याच्या निर्णयाबरोबरच दूतावासातील भारतीय कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले पगार व भत्ते यांचे तपशीलही केंद्र सरकारने मागवून घेतले आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या कृतीचा निषेध म्हणून नरेंद्र मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वच नेत्यांनी विविध कारणांनिमित्ताने भारताच्या दौऱ्यावर आलेल्या अमेरिकी शिष्टमंडळांना भेटण्यासही स्पष्ट नकार दिला आहे. येथील न्याय मार्गावरील अमेरिकी दूतावासाभोवतालची सुरक्षा सैल करण्यात आली असून या मार्गावरील प्रतिबंधात्मक अडथळेही दूर करण्यात आले आहेत.

लादलेल्या काही अटी
*दूतावासातील अमेरिकी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचे विशेषाधिकार काढले
* त्यांचे विमानतळ पास माघारी घेतले; ओळखपत्रे परत करण्याचे फर्मान
* मद्य किंवा तत्सम वस्तूंना विमानतळावर मिळणारे आयात परवाने रद्द
* दूतावासातील भारतीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते यांचा तपशील सादर करण्याचे आदेश
* अमेरिकी शाळांमध्ये शिकवणाऱ्या भारतीयांच्या वेतनाची माहितीही मागवली

उत्तम खोब्रागडेंची गृहमंत्र्यांशी चर्चा
देवयानी यांचे वडील व माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन देवयानी यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल केंद्र सरकारकडे दाद मागितली. आपल्या मुलीला बळीचा बकरा बनवले जात असल्याचेही ते म्हणाले.