जगभरात थैमान घालणाऱ्या करोना महामारी विरोधातील युद्धात भारताचे आज महत्वपूर्ण पाऊल पडत आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (शनिवार)सुरूवात होत आहे. जगातील सर्वात मोठा असा हा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे.

करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

तसेच, राज्यव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात होणार आहे. मुंबईमधील एकूण ९ केंद्रांवरील ४० बूथवर लसीकरण केले जाणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे.

लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर; राज्यांना महत्वाच्या सूचना

केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच यामध्ये सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही तसंच स्तनपान करणाऱ्या मातांचं लसीकरण करु नये असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.