ज्येष्ठ गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांना अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार शनिवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते येथे ६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
विज्ञान भवनात झालेल्या एका शानदार समारंभात गुलजार पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असताना उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली. या वेळी त्यांची कन्या मेघना भावूक झाल्या.
आपली कृतज्ञता शब्दांत व्यक्त करण्यासाठी शब्दच न सापडण्याची वेळ आयुष्यभर शब्दांशी खेळणाऱ्या व्यक्तीवर अभावानेच येते असे गुलजार यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले. लष्कर आणि चित्रपट उद्योग या दोनच क्षेत्रात जातीधर्माला थारा नसतो, चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती खरोखरच छान असतात, असेही ते म्हणाले.
सुवर्णकमळ, १० लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.