काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या पाच तासांच्या बैठकीत, पक्षांतर्गत निवडणुकांच्या मुद्दय़ावर बंडखोर काँग्रेस नेते ठाम राहिले. काँग्रेस अध्यक्षच नव्हे तर, कार्यकारी समिती आणि संसदीय मंडळाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीही निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी या नेत्यांनी केल्यामुळे राहुल गांधींचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेत्यांमधील मतभेद कायम असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.

पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र २३ बंडखोर काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पाठवले होते. त्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच सोनिया यांनी ‘१० जनपथ’ या निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी-वढेरा याही उपस्थित होत्या.

पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक समितीने सुरू केली असली, तरी पक्षातील सर्वोच्च निर्णय समिती असलेली कार्यकारी समिती आणि संसदीय मंडळाच्या निवडणुकीबाबत पक्षनेतृत्वाने निर्णय घेतलेला नाही. पक्षाच्या या दोन निर्णय समित्यांवर कार्यकर्त्यांनी निवडून  दिलेले सदस्य नियुक्त झाले, तर पक्ष संघटना मजबूत होईल असा मुद्दा बंडखोर नेत्यांनी मांडला.

बंडखोर नेत्यांच्या पत्रात पी. चिदंबरम यांचा समावेश नसला तरी त्यांनी बंडखोर नेत्यांना पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मुख्यालय पूर्ण वेळ कार्यरत राहिले पाहिजे, आत्ता तेथे कोणीही नसते, असा मुद्दा चिदंबरम यांनी बैठकीत मांडला. त्यांचा रोख राहुल गांधी यांच्यावर असल्याचे समजते. पूर्णवेळ उपलब्ध असणारा पक्षाध्यक्ष निवडण्याची मागणी बंडखोर नेत्यांनी पत्राद्वारे केली होती. त्याचा चिदंबरम यांनी पुनरुच्चार केल्याचे मानले जाते. काँग्रेसमध्ये ‘महासचिव’ संस्कृती बळावली असल्याने पक्षाचे नुकसान होत असून बूथ स्तरावर पक्ष मजबूत केला पाहिजे, असाही मुद्दा चिदंबरम यांनी मांडल्याचे समजते.

गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी आदी बंडखोर नेते तसेच, ए. के. अ‍ॅन्टनी, अंबिका सोनी, अशोक गेहलोत, कमलनाथ, हरीश रावत, पवन बन्सल, अजय माकन आदी गांधी निष्ठावान यावेळी उपस्थित होते. मात्र, राहुल गांधी यांच्या निकटचे मानले जाणारे रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल  गैरहजर होते. बैठकीला उपस्थित १९ नेत्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.

राहुल यांनी बैठकीत बंडखोर नेत्यांना भावनिक आवाहन करण्याबरोबरच त्यांच्यावर टीकाही केल्याचे कळते. पूर्वी राहुल निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये अहमद पटेल हे दुवा असत. मात्र, त्यांच्या निधनामुळे ही जबाबदारी कमलनाथ यांनी स्वीकारली होती. त्यांनी सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतल्यानंतर शनिवारी ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. राहुल यांनी कमलनाथ आणि गेहलोत यांच्यावर केलेली टीका अनपेक्षित असल्याचे ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

राहुल गांधी यांच्याशी कोणताही वाद नाही. पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून त्याद्वारे नवा अध्यक्ष निवडला जाईल, असे सांगत महासचिव पवन बन्सल यांनी राहुल यांच्या पक्षाध्यक्षपदी फेरनियुक्तीच्या प्रश्नाला बगल दिली. पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत राहुल यांनी बैठकीत उत्सुकता दाखवली नसल्याचे सांगितले जाते.

काँग्रेसच्या ९९.९ टक्के कार्यकर्त्यांना राहुल हेच पक्षाध्यक्ष बनावेत असे वाटते, असे विधान राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी केले होते. या बैठकीत राहुल गांधी यांना ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला नाही. राहुल यांनीही पक्ष सांगेल त्यानुसार आपण कार्यरत राहू असे ज्येष्ठ नेत्यांना सांगितल्याची माहिती बन्सल यांनी बैठकीनंतर  दिली.

‘राज्य तुमचे, पण चालवतो संघ’

तुम्ही (बंडखोर नेते) माझ्या वडिलांबरोबर (राजीव गांधी) काम केले. तुम्हाला विश्वासात घेऊन काम करू, असे भावनिक आवाहन राहुल गांधी यांनी केल्याचे सांगण्यात येते. पक्षांतर्गत संवाद वाढवण्याची गरज असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. ‘‘तुम्ही मुख्यमंत्री होतात वा आहात, पण तुमचे राज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना चालवते’’, अशी टीका राहुल यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना उद्देशून केल्याचे समजते.

चिंतन बैठक शक्य..

यापुढेही बैठका घेतल्या जाणार असून पंचमढी, सिमला बैठकीप्रमाणे चिंतन बैठकही होऊ  शकेल. करोना साथीमुळे कार्यकारी समिती वा अन्य समित्यांच्या बैठका झाल्या नव्हत्या, पण त्याही घेतल्या जातील, अशी माहिती ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.

बैठकीत राहुल गांधी यांना ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला नाही. पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून त्याद्वारे नव्या अध्यक्षांची निवड होईल.

– पवन बन्सल, महासचिव, काँग्रेस