भारतासह अमेरिका, ऑस्टे्रलिया आणि जपान या चार देशांच्या पहिल्याच क्वाड परिषदेत चीनने निर्माण केलेल्या आव्हानांवर चर्चा करण्यात आली आणि चीनबद्दल आमच्या मनात भ्रम नसल्याचे या चारही देशांनी स्पष्ट केले आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जेक सलिव्हन यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यात आभासी पद्धतीने ऐतिहासिक शिखर परिषद झाली, त्यानंतर या चारही नेत्यांनी या वर्षाअखेर प्रत्यक्ष भेटून शिखर परिषद घेण्याचे मान्य केले, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

म्यानमारवरही चर्चा

मुक्त जलवाहतूक आणि दक्षिण व पूर्व चीन सागरातील मुक्त वातावरण, उत्तर कोरियाचा आण्विक प्रश्न आणि म्यानमारमधील लष्कराचे बंड व हिंसक दडपशाही यासह महत्त्वाच्या प्रादेशिक प्रश्नांवर या चार नेत्यांनी चर्चा केली, असे सलिव्हन म्हणाले. चीनने निर्माण केलेल्या आव्हानांबाबत चर्चा करण्यात आली असली तरी ही चर्चा प्रामुख्याने चीनबाबत नव्हती, असे ते म्हणाले.

सलिव्हन हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्थनी ब्लिंकन यांच्यासह चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची १८ आणि १९ मार्च रोजी अलास्कामध्ये भेट घेणार आहेत.