टूल किट प्रकरणातील आरोपी दिशा रवी हिला कायद्यानुसारच अटक केली आहे. ती २२ वर्षांची आहे की ५० वर्षांची याचा कायद्याच्या दृष्टिकोनातून कुठलाही प्रश्न येत नाही, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन श्रीवास्तव यांनी सांगितले.

वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, की जेव्हा लोक २२ वर्षांच्या कार्यकर्तीला अटक केल्याबाबत आक्षेप घेतात, तेव्हा ते चुकीचे आहे कारण सदर महिला किती वर्षांची आहे, हा यात मुद्दा नाही. रवी हिला बेंगळूरुमधून शनिवारी टूल किटप्रकरणी अटक करून दिल्लीत आणण्यात आले व नंतर पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलिसांनी असा दावा केला आहे, की तिनेच टूल किट हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला टेलिग्रामच्या माध्यमातून पाठवले होते. नंतर तिने ते प्रसारित केले.

दरम्यान, दिशा रवी हिला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांचे ‘झूम’ला पत्र

शेतकऱ्यांच्या आदोलनाला पाठिंबा देण्यासाठी टूलकिट तयार करण्याबाबत ११ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत कोण सहभागी झाले होते त्याबाबतचा सविस्तर तपशील देण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्यासपीठ असलेल्या ‘झूम’कडे केली आहे. दरम्यान दिशा रवी (२१) हिला अटक करण्यात आली त्याबद्दल दिल्ली महिला आयोगाने (डीसीडब्ल्यू) दिल्ली पोलिसांना नोटीस पाठविली आहे.