टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपासची सूत्रं अधिक वेगाने फिरवली जात आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या २१ वर्षीय दिशा रवीच्या अटकेनंतर, सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील निकिता जेकब यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट निघाले आहे. तर, दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिशा रवी, निकिता जेकब व शांतनु यांनी टूलकिट तयार केले आणि एडिट करण्यासाठी ते इतरांना शेअर केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तसेच, दिशा रवीच्या सेलफोनमधून पुरावे मिळाले आहेत, अशी देखील माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. एनडीटीव्हीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

टूलकिट प्रकरण: ‘दिशा’नंतर निकिता जेकब यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

दरम्यान दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या हवाल्याने माहिती समोर आली आहे की, प्रजासत्ताक दिनी ‘ट्विटर स्टॉर्म’ निर्माण करण्याचा आरोपींचा उद्देश होता. याप्रकरणी निकिता जेकब व शांतनु विरोधात अजामानिपत्र वॉरंट निघाले आहे.

दिल्ली पोलिसांकडून पत्रकारपरिषदेत सांगण्यात आलं की, टूलकिट प्रकरणात पोएटीक जस्टिस फाउंडेशनचा देखील सहभाग आहे. जानेवारीत टूलकिट बनवण्यात आलं जेणेकरून आंदोलन अधिक वाढेल. ते परदेशात पोहचवता येईल व परदेशातील भारतीय दूतावासांना लक्ष्य केलं जाईल.

दिल्ली पोलिसांच्या मते ११ जानेवारी रोजी झूम मिटींग करण्यात आली होती. या मिटिंगमध्ये निकिता, शांतनु आणि दिशा सहभागी झाले होते. या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलं होतं की २६ जानेवारी रोजी ट्विटर स्टॉर्म निर्माण केलं जाईल. या झूम मिटिंगमध्ये जवळपास ६० ते ७० जणं सहभागी झाले होते.