भारतातील सर्वाधिक जुन्या दिग्गज व्यावसायीक घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज उद्योग समुहाच्या संपत्तीची वाटणी होण्याची शक्यता आहे. कारण, गोदरेज कुटुंबात सध्या संपत्तीवरुन वाद सुरु असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे.

गोदरेज कुटुंबातील काही कौटुंबीक करारांमध्ये बदल करण्यावर सध्या चर्चा सुरु आहे. म्हणजेच या कुटुंबात भविष्यातील उद्योगाच्या योजनांबाबत मतभेद सुरु आहेत. आदि गोदरेज, नादिर गोदरेज आणि त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज या तीन भावंडांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत. खरंतरं गोदरेज कुटुंबाकडे मुंबईत हजारो एकर जमीन आहे. या जमीनीचा वापर कसा करायचा यावरुन या कुटुंबामध्ये मुख्यत्वे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची वाटणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, जमशेद गोदरेज यांचे पुत्र नवरोज गोदरेज यांनी गोदरेज अॅण्ड बॉयस कंपनीतील कार्यकारी संचालकपदही सोडले आहे. त्यांनी हे पद सोडल्याने त्यांची बहीण नायरिका होळकर यांच्याकडे या कंपनीची सुत्रे जाण्याची शक्यता आहे.

या वादासंदर्भात गोजरेज समुहाच्या एका प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, गोदरेज कुटुंबीय आपापली बाजू गुरुवारी जाहीर करतील. गोदरेज अॅण्ड बॉयस ही कंपनी गोदरेज कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आहे. या कंपनीकडे मुंबईत सर्वाधिक जमीन आहे. मुंबईत या कंपनीकडे ३,४०० एकरपेक्षा अधिक जमीन आहे. यांपैकी ३००० एकर जमीन ही विक्रोळीत आहे. तर उर्वरित जागा ही भांडूप आणि नाहूरमध्ये आहे.