लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना आयुष्मान भारत योजनेची प्रशंसा करणं चांगलंच महागात पडलं आहे. इंदूर मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांच्या रोषाचा सामना करावा लागला. आयुष्मान भारत आणि त्यासारख्या योजना सरकारने आणल्या मात्र त्या योजनेचा पैसा डॉक्टर आणि रूग्णालयांपर्यंत पोहचत नाही असा आरोप डॉक्टरांनी केला. या कार्यक्रमात सुमित्रा महाजन पाहुण्या आल्या होत्या.

सुमित्रा महाजन या जेव्हा बोलण्यासाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत यांसारख्या योजनांचा उल्लेख केला. भाजपाच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही हेदेखील त्यांनी सांगितलं. मात्र आयुष्मान भारत योजनेबाबत त्यांनी बोलण्यास सुरूवात केली तेव्हा उपस्थितांमधील डॉक्टरांना ते पटले नाही. काही डॉक्टरांनी या योजनेची अंमलबजावणी योग्य रित्या होत नाही असा आरोप केला.

या डॉक्टरांच्या आरोपांना उत्तर देताना सुमित्रा महाजन म्हणाल्या की, अनेकदा रूग्णांकडून मोठ्या प्रमाणावर बिलाच्या नावाने पैसे वसुल केले जातात. अनेक लोक माझ्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी आणतात. त्या हे बोलत असताना चिडलेल्या डॉ. के. एल बंडी यांनी सुमित्रा महाजन यांच्या हातातील माईक खेचून घेतला. मग ते म्हटले की मला एक बिल दाखवा ज्यात सरासरी बिल तीन ते चार लाख दिलं गेलं आहे. असं दाखवून दिलंत तर मी वैद्यकीय क्षेत्र सोडून देईन असंही डॉ. बंडी यांनी म्हटलं. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

डॉक्टरांना बदनाम केलं जातं आहे, योजनांचा पैसा सरकार आम्हाला वेळेवर देत नाही. पैसा वेळेवर मिळण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना काही तरी हवं असतं. या सगळ्या परिस्थितीमुळे हुशार विद्यार्थीही या क्षेत्राकडे वळत नाहीत असंही डॉक्टर बंडी यांनी म्हटलं आहे.