शहाबुद्दीनच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेने जनता दलामध्ये नाराजी

बिहारमधील धर्मनिरपेक्ष महाआघाडी सरकारमध्ये पहिलाच मोठा तणाव निर्माण झाला असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारागृहातून सुटका झालेला राजदचा नेता शहाबुद्दीन याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर केलेल्या शेरेबाजीला राजदचे नेते रघुवंश प्रसाद सिंह यांनी पाठिंबा दिल्याने जद(यू)ने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आघाडीच्या तत्त्वांबाबतची आचारसंहिता पाळण्यास सांगावे, असे आवाहन जद(यू)ने केले आहे. रघुवंश प्रसाद सिंह सारखा नेता सातत्याने बेजबाबदार विधाने करीत आहेत, अशा प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन लालूप्रसाद यादव यांना केल्याचे ज्येष्ठ मंत्री विजेंद्र प्रसाद यादव आणि राजीव रंजन सिंह लल्लन यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

महाआघाडीत अनेक पक्ष आहेत आणि लालूप्रसाद आमचे नेते आहेत, आघाडीतील पक्षांनी निवडणुकीपूर्वीच नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता, आपण त्याला अनुकूल नव्हतो, मात्र त्यांनी निर्णय घेतला होता, शहाबुद्दीनच्या वक्तव्यात गैर काय आहे, नितीशकुमार हे परिस्थितीनुसार झालेले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळामुळे झालेले नाहीत, असे रघुवंशप्रसाद सिंह म्हणाले होते.

नितीशकुमार हे परिस्थितीनुसार झालेले मुख्यमंत्री आहेत, असे वक्तव्य शहाबुद्दीनने केले होते.

जनता दलाच्या आमदारावर कारवाई शक्य

मोहम्मद शहाबुद्दीनच्या स्वागतावेळी हजर राहिलेले आपल्या पक्षाचे आमदार गिरिधारी यादव यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार जद(यू) करत आहे.पक्षाच्या नेतृत्वाने नोंद घेतली आहे, असे जद(यू)चे प्रवक्ते संजयकुमार सिंह यांनी पत्रकारांना सागितले. राजदच्या या नेत्याने आमच्या मुख्यमंत्र्यांवर गरळ ओकले त्या वेळी त्यांच्यासोबत दिसण्याची यादव यांची कृती आम्हाला मान्य नसून त्यांच्यावर कारवाईचा विचार पक्षात सुरू असल्याचे ते म्हणाले.