ईशान्येकडील आसाम व मिझोराम या राज्यातील अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या राज्यातील जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचे आरोप केल्याने तणाव निर्माण झाला आहे.

आसामने कोलासिब जिल्ह्यात अतिक्रमण केले आहे, असा आरोप मिझोरामने बुधवारी केला. हा जिल्हा आसामच्या सीमेलगत आहे. तर मिझोराम आसाममधील हैलाकांडी येथे दहा किलोमीटर आतपर्यंत अतिक्रमण करून इमारती बांधून सुपारी व केळीची लागवड करीत आहे, असा आसामच्या अधिकारी व आमदारांनी आरोप केला.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी असे सांगितले की, राज्याच्या सीमेवरील वसाहतींबाबतचे प्रशद्ब्रा सामंजस्याने सोडवले जातील. कोलासिब जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वनलालफाका राल्टे यांनी असा दावा केला की, शेकडो अधिकारी व पोलीस आसामच्या हैलाकांडी जिल्ह्याच्या उपआयुक्त व पोलीस अधीक्षकांसह मंगळवारी मिझोरामच्या हद्दीत आले आहेत. ऐटलांग नदी असलेला ऐटलांग प्रदेश मिझोरामचा असून कोलासिब जिल्ह्यात वैरेंगटे खेड्याजवळ आसामच्या हद्दीलगत पाच कि.मी अंतरावर आहे.

मिझोरामने चुनिनुल्ला, ऐसानांगलोन भागात दहा किलोमीटर आत येऊन अतिक्रमण केले आहे, असा आरोप काटलीचेरातील एआययूडीएफचे आमदार सुझामुद्दीन लास्कर यांनी केला. आसामच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हैलाकांडीचे वनअधिकारी मोंटाज अली व पोलीस अधीक्षक निर्मल घोष व इतर काही जण सीमेवर आले होते पण त्यांना मिझो अतिक्रमकांनी रोखले व परत पाठवले.

वैरांगटेमध्ये वनस्पतींची लागवड आधीपासून झालेली असून हा भाग सुरुवातीपासून मिझोरामचा आहे असा दावा राल्टे यांनी केला आहे. हा भाग मिझोरामचा असूनही आसामने अतिक्रमण केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान मंगळवारी अधिकाऱ्यांची घटनास्थळी चर्चा झाली पण आसामच्या अधिकाऱ्यांनी माघारीस नकार दिला. वैरांगटेचे रहिवासी सीमेवर आले होते पण अनर्थ टाळण्यासाठी त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. कोलासिबचे पोलीस उपआयुक्त एच लस्थांगलिया यावेळी उपस्थित होते.