”मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते, पण फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन त्यांचा धर्मग्रंथ कुराणच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे. मला खूप वाईट वाटतंय. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते पण त्याचसोबत मला उच्च न्यायालयात माझी बाजू मांडण्याचाही अधिकार आहे. कुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसा काय करु शकतं? फेसबुकवर स्वतःच्या धर्माबाबत लिहिणं कोणता गुन्हा आहे? मी एक सामान्य विद्यार्थिनी असतानाही मला अचानक अटक करण्यात आली”. रांची विमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिचा भारती उर्फ रिचा पटेल हिने ‘बीबीसी’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिलीये.

”ज्या फेसबुक पोस्टसाठी मला अटक करण्यात आली ती पोस्ट मी ‘नरेंद्र मोदी फँस क्लब’ नावाच्या एका ग्रुपवरुन कॉपी केली होती आणि नंतर माझ्या फेसबुक पेजवर टाकली होती. त्या पोस्टमध्ये इस्लाविरोधात काहीही नव्हतं. अद्याप मला न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळालेली नाही. प्रत मिळाल्यानंतर कुराण वाटप करण्याच्या आदेशाचं पालन करावं की याविरोधात उच्च न्यायालयात धाव घ्यायची हा निर्णय घेईन” असंही ती म्हणाली.

कोण आहे रिचा पटेल –
रिचा पटेल पदवीच्या अंतिम वर्षात असून आपल्या कुटुंबियांसह ती रांचीतील पिठोरिया येथे राहते. तिच्याविरोधात मुस्लीम सामाजिक संघटना अंजुमन इस्लामियाचे प्रमुख मन्सूर खलिफा यांनी पिठोरिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि नंतर अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर स्थानिकांमध्ये रोष पसरला होता. काही हिंदू संघटनांनी सुटकेसाठी निदर्शनही केलं होतं. ग्रामीण पोलीस अधिक्षक आशुतोष शेखर यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झालं होतं. त्यानंतर दोन्ही समुदायांनी संमती दर्शवल्यानंतर न्यायालयाने रिचा भारतीला जामीन मंजूर केला. त्यावर रिचा भारतीच्या वकिलांनी १५ दिवसांत आदेशाचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. हिंदू संघटना आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती, आणि आता रिचा भारतीने कुराणाच्या प्रती वाटायला सांगणं हा माझ्या मुलभूत अधिकाराचा भंग असल्याचं म्हटलं आहे.