पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशाचे आर्थिक धोरण दिशाहीन झाले असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे.
काँग्रेसच्या राजवटीत कोणताही विकास झाला नाही हा अपप्रचार असल्याचेही डॉ. सिंग म्हणाले. आर्थिक धोरणे दिशाहीन झाली आहेत आणि नियोजन आयोग बरखास्त करणे हे त्याचे मुख्य कारण आहे, असेही माजी पंतप्रधान म्हणाले.
इंदिरा गांधी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त भारतीय युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या एका राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. नियोजन आयोग बरखास्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय देशासाठी किती हानिकारक आहे, ते जनतेला पटवून देण्याचे आवाहन डॉ. सिंग यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.
सुनियोजित विकास या पं. जवाहरलाल नेहरू यांच्याच मार्गाचे अनुकरण इंदिरा गांधी यांनी केले. देशाच्या सर्व भागांचा विकास होण्यासाठी नियोजन आयोग गरजेचा आहे, यावर इंदिरा गांधी यांचा विश्वास होता, असेही ते म्हणाले.