केंद्राने १० मेट्रिक टन व २० मेट्रिक टन क्षमतेचे क्रायोजेनिक टँकर आयात केले असून ते राज्यांना वितरित करण्यात आले आहेत. अनेक राज्यात सध्या प्राणवायूची टंचाई असून कोविड १९ रुग्णांतील मृतांची संख्या प्राणवायूअभावी वाढत आहे. द्रव वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पापासून विविध राज्यांत वाहून नेणे ही वेगळी प्रक्रिया आहे. त्यात क्रायोजेनिक टँकर अपुरे पडत होते. पूर्वेकडील भागातून प्राणवायू दुसऱ्या भागात नेण्यात अडचणी होत्या. आता २० मेट्रिक   टन व १० मेट्रिक टनचे वीस क्रायोजेनिक टँकर आयात करण्यात आले असून त्यामुळे प्राणवायूची वाहतूक सोपी होणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने उद्योग व आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन मंडळ यांनी सक्षम गट २ च्या अधिपत्याखाली क्रायोजेनिक टँकर्सची आयात करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, या राज्यांना हे टँकर वितरित करण्यात आले आहेत, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.