संगीत नाटक अकादमीच्या वतीने देण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार या वर्षी भारतीय संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या देशभरातील ३२ युवा कलाकारांना जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत एका शानदार कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ८ ते १५ सप्टेंबर या काळात संगीत नाटक अदाकमीच्या मेघदूत संकुलात एका विशेष महोत्सवाचेही आयोजन केले आहे.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा स्वतंत्र विभाग असणाऱ्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. संगीत, नाटक, लोकसंगीत, लोकनृत्य आदी क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या ४० वर्षांखालील युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात यतो.
संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा लीना सॅमसन यांच्या हस्ते उद्या शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता नवी दिल्लीतील तानसेन मार्ग येथील फिक्कीच्या सभागृहात हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.
संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल- जयतीर्थ मेवउंदी (हिदुस्तानी शास्रीय संगीत), सत्यजित सुरेश तळवळकर (तबला), श्रीनिवास सातपथी (बासरी), राहुल शर्मा (संतूर),अभिषेक रघुराम (कर्नाटक गायकी), मंदा अनंत कृष्णा (कर्नाटकी वाद्यसंगीत -बासरी), पुण्य श्रीनिवास (वीणा), एस.एस.भास्कर (व्हायोलिन)
नृत्य विभागासाठी-मीनाश्री श्रीनिवासन (भरतनाटय़म), नम्रता पमनानी (कथ्थक), रेंजिनि के पी (कथकली), गुरुमायम चंदनदेवी (मणिपुरी), कुरवी व्यंकट सुब्रमण्यम प्रसाद (कुचिपुडी), सोनाली मोहपात्रा (ओडिसी), दिलीप चंद्र महातो आणि सुधा रघुरामन नाटक विभागासाठी- राम जी बाली आणि मुरुगाबुपथी (लेखन), प्रवीण कुमार, राशी बन्नी भटनागर, शंकर व्यंकटेश्वरन आणि पवित्र राभा (निर्देशन), रयंती राभा (अभिनय), गौतम हलदर यांची निवड झाली आहे. याशिवाय पारंपरिक लोकसंगीत, नृत्य आदी विभागातील कलाकारांचीही उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती संगीत नाटक अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.