संयुक्त राष्ट्रांमध्ये जाईन – आझम खान ल्ल बिशाडा परिसरात नेत्यांच्या प्रवेशावर र्निबध
दादरीतील घटनेवरून राजकीय चिखलफेक तीव्र झाली आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांकडे नेणार असल्याचे सांगून अकलेचे तारे तोडले आहेत. तर वादग्रस्त भाजप आमदार संगीत सोम यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, जवळच्या एका खेडय़ात मांसाचे तुकडे सापडल्याने तणाव वाढल्यामुळे प्रशासनाने येथे लोकांच्या येण्यावर प्रतिबंध घातले आहेत.
गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून हत्या करण्यात आलेल्या मोहम्मद अखलाक याच्या बिशाडा गावापासून ५ किलोमीटर अंतरावरील चिथेरा खेडय़ात रविवारी सायंकाळी मांसाचे तुकडे सापडले. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला. भाजपचे आमदार संगीत सोम यांनी रविवारी बिशाडा खेडय़ात तसेच पत्रकारांसमोर केलेल्या वक्तव्यांचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले आहे. हे चित्रण तपासण्यास कायदेतज्ज्ञांना सांगण्यात आले असून, कायद्यानुसार जी कारवाई करणे आवश्यक असेल ती केली जाईल, असे जिल्हा दंडाधिकारी एन. पी. सिंग यांनी सांगितले. दादरी येथील हत्या ‘पूर्वनियोजित’ होती आणि ती भाजपने घडवून आणली, असा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी लखनौमध्ये केला. रा. स्व. संघ समाजाला धार्मिक आधारावर विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा हल्ला त्यांनी चढवला. या घटनेबाबत आपण संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिणार असल्याचे समाजवादी पक्षाच्या या नेत्याने सांगितले. बिशाडा खेडय़ातील घटनेचा राजकीय फायदा घेण्यासाठी अनेक नेते तिकडे धाव घेत असल्यामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या, तसेच येथे उपद्रव करू शकणाऱ्यांच्या प्रवेशावर र्निबध घातले आहेत.

दादरीतील हत्येच्या घटनेमुळे संवेदनशील झालेल्या वातावरणात अफवा पसरवल्या जात असून, इतर लोकांचे आयडी वापरून होणाऱ्या ‘हॅकिंग’मुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.