कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा भाजपाची वाटचाल पूर्ण बहुमताच्या दिशेने सुरु होती. मात्र जसजसे निकाल लागत गेले त्यावरून भाजपाची वाटचाल ही पूर्ण बहुमताकडे झाली नाही. भाजपा हा कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र काँग्रेस आणि जेडीएस यांनी एकत्र येण्याची घोषणा करत भाजपाला कात्रीत पकडले आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी आठ दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र राज्यपाल यावर काय निर्णय देणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशात फोडा आणि राज्य करा हे भाजपाचे धोरण कर्नाटकात चालणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला. या दोघांनीही भाजपा आमच्यात फूट पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेल मात्र त्यात ते मुळीच यशस्वी होणार नाहीत असे म्हटले आहे. भाजपाने सध्याच्या घडीला १०४ जागा जिंकल्यात जमा आहेत. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला आणखी ९ आमदारांची गरज आहे. यामुळेच भाजपाने ८ दिवसांची मुदत मागत सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होऊ असा दावा केला आहे.

मात्र काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी आमची आघाडी आहे आणि बहुमत आम्ही सिद्ध करू शकतो असे म्हटले आहे. तसेच त्यासाठीच राज्यपालांचीही भेट घेतली आहे. गोव्यात भाजपाने जे केले त्याचा वचपा काढण्यासाठी आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने ही खेळी खेळली आहे. यात काँग्रेस यशस्वी होणार का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एवढेच नाही तर आता भाजपा नेमके काय करणार हे पाहणेही महत्त्वाचे असणार आहे.

काही वेळापूर्वीच काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळीही त्यांनी कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केला. तसेच भाजपा कोणत्याही फोडाफोडीत यशस्वी होणार नाही आम्हाला कोणताही धोका वाटत नाही असेही काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.