दसरा संपल्यानंतर आता नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळी म्हटले की, खरेदी ही आलीच. घर खर्च तसेच दिवाळी खरेदीचे आर्थिक नियोजन करायचे असल्यास बँकेतून लवकरात लवकर पैसे काढून घ्या. कारण ऐन दिवाळीत चार दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी पैशांची जुळणी करायची असेल तर त्याचे नियोजन करून घ्या. ऐन दिवाळीत चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर बँकाना सलग पाच दिवस, ११ दिवस बँका बंद राहणार अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. पण आम्ही बँकेशी संपर्क केला असता दिवळीमध्ये बँकाना चार दिवसाची सुट्टी असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असे दोन दिवस सलग बँका बंद असतील. त्यानंतर शुक्रवारी बँका सुरू राहणार आहेत. त्यानंतर दुसरा शनिवार असल्यामुळे १० तारखेला सुट्टी असेल. त्यानंतर ११ नोव्हेंबरला रविवार असल्याने पुन्हा बँका बंद असतील. त्यामुळे तुमची काही महत्त्वाची कामे असल्यास ती आताच करुन घ्यावीत. अन्यथा दिवाळीनंतर बँकांमध्ये एकच गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान बँकां बंद असल्याने एटीएममध्येही खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे एटीएममधूनही वेळीच काढून ठेवायला हवेत असे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय किंवा इतर तातडीच्या खर्चांसाठी लागणारे पैशांची आधीच तजवीज केल्यास ऐन दिवाळीच तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
नोव्हेंबरमध्ये १० दिवस बँका बंद –
पुढील महिन्यात सणांची मांदियाळीच असल्याने तब्बल दहा दिवस सरकारी सुट्ट्या असणार आहेत. दिवळीत दोन दिवस, ईद आणि गुरुनानक जयंती या दिवशीही बँकांना सुट्टी असणार आहे. चार रविवार आणि दोन शनिवार असे एकूण १० दिवस बँका बंद राहणार आहेत. १३ आणि १४ नोव्हेंबरला काही राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. काही राज्यात छठ पूजेची सुट्टी बँकांना सुट्टी असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 11:27 am