पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना अप्रत्यक्षरित्या स्वदेशी वापरण्याचे आवाहन केले आहे. आपल्या खरेदीमुळे देशातील नागरिकांचा फायदा होतो का, हा विचार जनतेने खरेदी करताना केला पाहिजे, असे मोदी यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. देशात उत्पादित केलेल्या पुजेच्या साहित्यापासून दिव्यांपर्यंतच्या खरेदीमुळे काही नागरिकांना फायदा होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलते, असे या व्हिडिओ दाखवण्यात आले आहे.

मोदींनी आपल्या व्हिडिओ संदेशात देशवासियांना शुभेच्छा देताना म्हटले की, माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या खरेदीमुळे देशातील एखाद्या नागरिकाचा फायदा होईल. एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल आणि गरिबांना त्याचा फायदा होईल याचा आपण विचार करायला हवा. यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. या पवित्र पर्वासाठी मी तुम्हा सर्वांना अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो.

पंतप्रधान मोदींचा हा संदेश केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी ट्विट केला आहे.