‘द्रमुक’चे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती किंचितशी खालावली असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले होते. करुणानिधी हे ९६ वर्षाचे असून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कावेरी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी अचानक कमी रक्तदाबाच्या समस्येमुळे करुणानिधी यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाने प्रसिद्ध केलल्या पत्रकात म्हटले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले आहे.

करुणानिधी हे मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कावेरी रुग्णालयाच्या वैद्यकीय बुलेटिनमधून देण्यात आली होती.

मात्र आता रात्री अचानक त्यांना कावेरी रुग्णायलयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, त्यांच्या निवासस्थानबाहेर आणि कावेरी रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणाबाहेर गर्दी केली आहे.

द्रमुकचे कार्याध्यक्ष एमके स्टॅलिन, कनिमोझी, एमके अलगिरी, दयानिधी मारन, टीआर बाळू आदी नेतेमंडळी एम करुणानिधी यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहेत.