पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा द्रमुक आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. या दोन्ही पक्षांचे नेते महिलांचा सातत्याने अपमान करीत आहेत, तर महिलांचे सक्षमीकरण हे रालोआच्या योजनांचे उद्दिष्ट आहे, असे मोदी म्हणाले.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. जी. रामचंद्रन यांचा सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक भरभराटीचा दृष्टिकोन यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, असे मोदी म्हणाले.

द्रमुक आणि काँग्रेस यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही, जनतेच्या सुरक्षेची, सन्मानाची ते हमी देऊ शकत नाहीत आणि त्यांच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

मदुराई हे शांतताप्रिय शहर आहे, मात्र कौटुंबिक प्रश्नांमुळे द्रमुक त्याला माफियांचा अड्डा बनवू पाहात होते, मदुराई महिला सक्षमीकरणाची शिकवण देते, असे सांगताना मोदी यांनी स्थानिक देवता मीनाक्षी अम्मनचा संदर्भ दिला.

उज्ज्वला योजनेसह रालोआच्या अनेक योजनांचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण हा आहे, द्रमुक आणि काँग्रेसला ते समजत नाही, त्यांच्याकडून महिलांचा सातत्याने अपमानच केला जात आहे, असेही मोदी यांनी  सांगितले.

स्टालिन यांच्या कन्येच्या निवासस्थानावर छापे

वेल्लोर (तमिळनाडू) : द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन यांची कन्या सेंथामराई यांच्या चेन्नईतील निवासस्थानी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी (आयटी) छापे टाकल्याबद्दल पक्षाने शुक्रवारी केंद्र सरकारचा निषेध केला. राजकीय उद्देशाने छापा टाकण्यात आल्याचा आरोप द्रमुकने केला आहे.

द्रमुक प्रचार पूर्ण करण्याच्या बेतात असताना आणि मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा करीत असताना सेंथामराई यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यामागे राजकीय उद्देश आहे, असे पक्षाचे सरचिटणीस दुराईमुरुगन यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वीच छापे टाकण्यात आले तर स्टालिन, त्यांचे कुटुंबीय आणि पक्षाला धक्का बसेल आणि पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीलाही त्याचा फटका बसेल असे चुकीचे गणित सरकारने मांडले, असे दुराईमुरुगन यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.