तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी काल चेन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चेन्नईमध्ये जनसागर लोटला होता. इतक्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर करुणानिधींना अनेक मोठ्या नेत्यांनी आणि मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. लोकसभेतही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी करुणानिधी यांचा मुलगा स्टॅलिन यांनी आपल्या वडिलांना एका कवितेद्वारे श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही कविता पोस्ट केली आहे. ही कविता तमिळ भाषेत केली आहे. स्टॅलिन कायम आपल्या वडिलांना थलाइवा म्हणजेच लीडर म्हणत. मात्र आपल्या ट्विटमध्ये त्यांनी मी आयुष्यभर तुम्हाला थलाइवा म्हणत आलो आता शेवटचे एकदा अप्पा म्हणू का? असा प्रश्न विचारला आहे. हे ट्विट अनेकांनी लाईक आणि शेअर केले आहे.

मागील ५० वर्षांपासून करुणानिधी द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची धुरा अतिशय सक्षमपणे सांभाळत होते. मात्र दोन वर्षांपूर्वीच त्यांनी आपला मुलगा स्टॅलिन याला आपला वरसदार घोषित करुन विविध चर्चांना पूर्णविराम दिला होता. परंतु त्यांनी स्वत: राजकारणातून कधीच सन्यास घेतला नव्हता आणि पक्षाची धुरा आपल्याच हाती ठेवली होती. आता स्टालिन कार्यकारी अध्यक्ष असून आता त्यांना अध्यक्षपद देतील अशीही चर्चा आहे. करुणानिधी यांची तीन लग्ने झाली होती. त्यापैकी स्टालिन हे दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहेत. अझागिरी आणि थामिलारासू आणि स्टॅलिन हे तिघे सख्खे बहिण-भाऊ आहेत.