पक्षातील सर्व पदांवरून हकालपट्टी करून प्राथमिक सदस्यत्वही निलंबित करण्यात आलेले द्रमुकचे खासदार आणि पक्षाचे नेते करुणानिधी यांचे पुत्र एम. के. अळगिरी चांगलेच संतप्त झाले आहेत. पक्षातील लोकशाहीच मृत झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर आपले बंधू एम. के. स्टालिन यांच्या समर्थकांनी पक्षाचे पुढील अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची पोस्टर्स लावली, त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल अळगिरी यांनी केला आहे.
पक्षांतर्गत निवडणुकांबाबत काही कार्यकर्त्यांनी जे आरोप केले त्याबाबतचे स्पष्टीकरण मागितल्याचे आपल्याला चांगलेच बक्षीस मिळाले, असे अळगिरी यांनी म्हटले आहे. या संदर्भात आपण पक्षाचे सर्वेसर्वा आणि आपले वडील करुणानिधी यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला. याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, परंतु कोणतीही कारवाई केली नाही, असेही अळगिरी म्हणाले.
द्रमुकमधील लोकशाही मृतावस्थेत असून आपण ३१ जानेवारी रोजी एका पत्रकार परिषदेत पक्षांतर्गत निवडणुकांमधील अनियमिततेचे पुरावे देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. संभ्रम निर्माण करण्याच्या आरोपावरून आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे निदर्शनास आणून दिले असता अळगिरी संतप्त झाले. आपल्या समर्थनार्थ पोस्टर लावणे चुकीचे असेल तर तोच मापदंड स्टालिन आणि त्यांच्या समर्थकांबाबत का लावण्यात आला नाही, असा सवालही अळगिरी यांनी केला.
आपल्या समर्थनार्थ पोस्टर लावणे गैर आहे का, असा सवाल त्यांनी केला. करुणानिधी हयात असतानाही स्टालिन यांच्या समर्थकांनी त्यांचा (स्टालिन) उल्लेख भावी मुख्यमंत्री आणि पक्षाचे भावी अध्यक्ष असा केला त्यांच्याविरुद्ध कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही अळगिरी यांनी केला.
लोकसभेची आगामी निवडणूक आपण लढणार नाही. त्याचप्रमाणे द्रमुकविरोधी उमेदवारही रिंगणात उतरविणार नाही, पक्ष स्वत:हूनच पराभूत होईल. एम. के. अळागिरी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 4:23 am