ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात मल्याळम कवी, गीतकार व पर्यावरणतज्ज्ञ ओ.एन.व्ही. कुरुप यांचे शनिवारी एका खासगी इस्पितळात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या कुरुप यांना दोन दिवसांपूर्वी इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.
मल्याळम साहित्यात कुरुप यांचे अमूल्य योगदान तर होतेच, शिवाय ते मल्याळम चित्रपट व नाटय़ क्षेत्रातील आघाडीचे गीतकार होते.
त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये ९०० हून अधिक गाणी लिहिली आहेत. त्यांना २००७ साली ज्ञानपीठ पुरस्काराने, तर २०११ साली पद्मविभूषण उपाधीने सन्मानित करण्यात आले होते.