राफेल करारावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात सुरु झालेल्या आरोपांच्या फैरी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. राहुल गांधी राफेल कराराचा मुद्दा पुढे करून भाजपावर आरोप करत आहेत. मात्र या संबंधीचा त्यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांनी व्यवस्थित गृहपाठ करावा मग आम्ही त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राफेल करारात काहीही चुकीचे घडलेले नाही. कोणताही भ्रष्टाचार नाही. राफेल करार करताना जे नियम होते त्यांचं काटेकोर पालन मोदी सरकारने केलं आहे असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचे नेते आणि त्या पक्षाचे अध्यक्ष अर्थात राहुल गांधी हे राफेल करारावरून नुसते आरोप करत सुटले आहेत. त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यांनी आधी सगळा गृहपाठ करावा मग प्रश्न विचारावेत आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

दरम्यान २२ तारखेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा हवाला दिला. अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल करारासाठी निवडण्यात फ्रान्सचा काहीही सहभाग नव्हता असे ओलांद यांनी म्हटले होते. याचाच आधार घेत राहुल गांधींनी आरोपांच्या फैरी झाडल्या.अनिल अंबानी यांना हजारो कोटींचे कंत्राट मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारात फेरफार केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असाही प्रश्न उपस्थित केला होता. या टीकेनंतर सातत्याने राहुल गांधी असोत किंवा काँग्रेसचे इतर नेते ते कायमच प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. या आरोपांना आज निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं आहे.