वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी सरकारने कडक कायदा करणे गरजेचे आहे. डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या नागरिकांना काळ्या यादीत टाकले पाहिजे तसेच त्यांना मिळणाऱ्या सर्व सरकारी वैद्यकीय सुविधा काढून घेतल्या पाहिजेत, अशी मागणी खासदार हेमा मालिनी यांनी गुरुवारी लोकसभेत बोलताना केली.


मालिनी म्हणाल्या, देशभरात विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत मला चिंता वाटते. या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी १७ जून रोजी देशभरातील सुमारे ८ लाख डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी या डॉक्टरांना मोठ्या दबावाखाली काम कारावे लागत आहे.

डॉक्टर्स हे आपले सुपरहिरो आणि देशाची संपत्ती आहेत. आपण देवावर विश्वास ठेवतो याच देवाच्या जागी आपण डॉक्टरांनाही मानतो. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले होणे हे निषेधार्ह आहे. हे हल्ले रोखण्यासाठी सरकारने कडक कायदा करायला हवा. या कायद्यांतर्गत असे हल्ले करणाऱ्या नागरिकांना काळ्या यादीत टाकायला हवे आणि त्यांच्या सर्व वैद्यकीय सुविधाही काढून घेण्यात याव्यात.