श्रीनगर : ‘आमच्या सीमाभागात सध्या एक प्रकारे रक्ताची होळी सुरु असल्याची स्थिती आहे. देश सध्या प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान वारंवार यावर बोलत आहेत. मात्र, आपल्या राज्यात सध्या सर्व विरुद्धच सुरु आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही पंतप्रधानांना मी आवाहन करते की जम्मू-काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका, मैत्रीचा पूल बनवा,’ असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. नव्या पोलीस तुकडीच्या पासिंग आऊट परेड कार्यक्रमात त्या उपस्थितांना संबोधित करताना बोलत होत्या.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामध्ये आपले अनेक जवान शहीद झाले आहेत. त्यांच्याही जवानांना यात मृत्यूचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर पोलिसांसमोर कठीण आव्हान आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांना आपल्याच लोकांशी सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याशी तडजोडी करताना स्वतःवर संयम ठेवणे खूपच गरजेचे ठरते, अशा शब्दांत मुफ्ती यांनी नव्याने प्रशिक्षण घेऊन पोलिस सेवेत रुजू होणाऱ्या तरुणांना आवाहन केले आहे.

गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. आज पुन्हा त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पाकिस्तानच्या या कृत्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले असून यात त्यांचे सैनिकही ठार झाले आहेत.